ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरू आहे. या मोहिमेत शुक्रवारी रात्री आठपर्यंत 6 लाख 13 हजार नागरिकांचे लसीकरण झाले. त्यामुळे आता राज्यात पहिला डोस मिळलेल्यांची संख्या 3 कोटी 47 हजार एवढी झाली आहे. तर 88 लाख 37 हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रस्थानी पोहचले आहे.

लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर असून दोन्ही डोस दिलेल्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक आहे. लसीकरणाला अधिक गती दिल्यास दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या लवकरच 1 कोटीचा आकडा पार करू शकेल. लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री आठपर्यंत सुमारे 6 लाख 13 हजार 865 एवढे लसीकरण झाले. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 3 कोटींपेक्षा अधिक झाली आहे.
- कोरोना चाचणीचा साडेचार कोटींचा टप्पा पार
या बरोबरच, महाराष्ट्रात कोरोना प्रयोगशाळा नमुना चाचणीचा साडेचार कोटींचा टप्पा पार झाला झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 01 हजार 337 रुग्ण उपचारार्थ आहेत.