प्रतिनिधी / कोल्हापूर
दुर्गराज रायगडला सोमवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भेट देऊन रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली तसेच अधिकाऱयांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. पावसाळ्यामुळे रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे बंद होती. आता पावसाळा संपल्याने या कामांना प्रारंभ झाला आहे. संभाजीराजे यांनी सोमवारी रायगडला भेट देऊन अधिकाऱयांसह पाहणी केली.
पाहणी नंतर माहिती देताना संभाजीराजे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून प्राधिकरण हत्ती तलावाच्या संवर्धनावर काम करत आहे. हत्ती तलावाची गळती काढण्यात यश आले आहे. या पावसाळ्यात एक गळती आढळलेली असून लवकरच त्यावरही शास्त्रोक्त पद्धतीने काम सुरू होणार आहे. याबरोबरच गडावरील इतर जलस्त्रोतांच्या संवर्धनावरही भर दिला जाणार आहे. गडावरील जिल्हा परिषदेच्या शेडची दुरूस्ती केली जात असून, शिवभक्त व पर्यटकांच्या विश्रांतीसाठी असणारी ही इमारत पूर्णतः ऐतिहासिक धाटणीची असावी, यासाठी सूचना दिल्या आहे.
गडावर विद्युतव्यवस्था करण्यासाठी जमिनीखालून विद्युतवाहिन्या बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून नजिकच्या काळात गडावर सर्वत्र विद्युत व्यवस्था झालेली पहायला मिळेल. त्याचबरोबर, उत्खनन, उर्वरीत पाथवे, लाईट अँड साऊंड शो इत्यादी कामेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.