प्रतिनिधी/ चाफळ
पाटण तालुक्यातील चाफळ येथे गुरुवारी भरदिवसा सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून झाला होता. मुलीचा गळा चिरून तिला संपवत पोलिसात हजर झालेल्या संशयिताला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
अनिकेत मोरे (वय 22) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित अनिकेतला शुक्रवारी पाटण न्यायालयात हजर करण्यात आले होते. अनिकेतचे चाफळ येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. गुरुवारी सकाळी ती अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी संशयित त्यांच्या घरात आला. त्याने निर्दयीपणे मुलीचा धारदार चाकूने गळा चिरला. काही कळायच्या आत झालेल्या घटनेने मुलगी रक्ताच्या थारोळ्यात जागीच पडली. त्यानंतर संशयित स्वतःहून पोलिसांत जाऊन हजर झाला होता. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे जिल्हाभर खळबळ उडाली होती. पोलिसांसह बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, अटकेत असलेल्या अनिकेतकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. त्याने मुलीचा खून नेमका का केला? याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.