खरेदीसाठी बाजारात रांगा, क्लोजडाऊनमुळे शांतता : गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मार्शल-पोलीस प्रशासनाची दमछाक

प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या क्लोजडाऊनला मंगळवारी रात्री 9 वाजल्यापासून प्रारंभ झाला. नियमावलीनुसार बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसून आली. वेळेची मर्यादा लक्षात घेता सकाळपासूनच दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. खरेदीसाठी शहराच्या बाजारपेठ परिसरात गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणात आणेपर्यंत मार्शल व पोलीस प्रशासनाची दमछाक झाली.
भाजी खरेदीसाठी आटापिटा
बुधवारी सकाळी भाजी, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांचा आटापिटा दिसून आला. थोडी भाजी जरी घ्यायची असल्यास नागरिक थेट मुख्य बाजारपेठ गाठत असल्याने गर्दीत वाढ होत आहे. शहराच्या विविध भागात भाजी, फळे, दूध यांची विक्री होत असतानाही बाजारपेठेत गर्दी होत असल्याने नाराजी व्यक्त होत होती. सकाळी 10 नंतर मात्र शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. विनाकारण फिरणाऱयांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती.
लग्नसराईच्या खरेदीसाठी तारेवरची कसरत
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने यापूर्वी अनेकांनी लग्नाचे मुहूर्त ठरविले आहेत. लग्नांना जरी परवानगी मिळत असली तरी साहित्याची जमवाजमव करेपर्यंत नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कपडे, सोने, शिलाई यांची दुकाने बंद असल्याने वधू-वरांच्या कुटुंबीयांची धांदल उडत आहे. खरेदीही केवळ 10 पर्यंतच करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
बॅरिकेड्स लावून रस्ते केले बंद
प्रशासनाने अनेक निर्बंध लावूनही काहीजण मात्र मोकाट फिरताना दिसत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर बरिकेड्स लावले आहेत. किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, शनिमंदिरजवळ बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वळसा घालून बाजारात पोहोचावे लागत आहे.
बँकांचे व्यवहार सुरळीत सुरू
क्लोजडाऊनच्या काळात बँका सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. परंतु बँकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून ग्राहक बँकांमध्ये दाखल झाले. आवश्यक असेल तरच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. बँकेतील कर्मचारी बाहेरच ग्राहकांकडून स्लिपवर सहय़ा घेत होते. दुपारी 2 पर्यंत बँका जरी सुरू असल्या तरी ग्राहक नसल्याचे चित्र दिसून आले.
औद्योगिक कारखाने सुरळीत सुरू
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 14 दिवस क्लोजडाऊनचा निर्णय घेतला आहे. सर्व व्यवहार बंद करून कोरोनाची साखळी तोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इतर व्यवहार ठप्प असले तरी सरकारने औद्योगिक कारखाने सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यामुळे बुधवारी क्लोजडाऊनच्या पहिल्या दिवशी औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरळीत सुरू होते.
बुधवारी सकाळपासून कामगार कामावर जाताना दिसत हेते. कामगारांना ओळखपत्रे देण्यात आली असून त्याद्वारे ते कामावर येऊ शकतात. पोलिसांनी चौकशी केल्यास त्यांना ओळखपत्र दाखवावे लागत आहे. उद्यमबाग, मजगाव, अनगोळ, मच्छे, वाघवडे रोड, नावगे रोड, होनगा, काकती येथील औद्योगिक वसाहती बुधवारी सुरळीत सुरू होत्या. तीन शिफ्टमध्ये काम सुरू असून कामगारांनाही रोजगार मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शिनोळी परिसरातील कामगारांची गैरसोय
बेळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्रातील शिनोळी येथील कामगार काम करीत आहेत. परंतु राज्य सरकारने अनेक नियम लादल्याने इतर राज्यांमधील कामगारांना येणे काहीसे कठीण झाले आहे. शिनोळी येथून येताना पोलिसांना अनेक उत्तरे द्यावी लागत आहेत. त्यामुळे कामगार कामावर येत नसल्याची तक्रार उद्योजक करीत आहेत. त्यामुळे यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
बँकेत रक्कम भरण्यासाठी वेळेत बदल करा

क्लोजडाऊन काळात सर्व व्यावसायिकांना सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, यामुळे व्यावसायिकांना बँकेत जाऊन पैसे भरणे अवघड जात आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी जाताना पोलिसांकडून अडवणूक होत आहे. तेव्हा या वेळेमध्ये बदल करून सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत मुभा द्यावी, अशी मागणी बेळगावमधील व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामीण भागातून तसेच इतर भागांतून खरेदी करण्यासाठी छोटे-मोठे व्यापारी व सर्वसामान्य जनता सकाळी 8 नंतरच घराबाहेर पडते. त्यामुळे सकाळी 6 वाजता दुकाने उघडी केली तरी ग्राहक नसतो. 10 वाजता मात्र खरेदीसाठी मोठी झुंबड उडत आहे. 10 वाजता नियमानुसार दुकाने बंद करावी लागतात. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे. याचा कुठे तरी गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे व्यवहार झाल्यानंतर जी रक्कम जमा होते ती बँकेमध्ये जमा करणे महत्त्वाचे आहे.
कारण सध्या ऑनलाईनने व्यवहार सुरू असला तरी बँकेमध्ये रक्कम जमा राहिली तरच आम्ही ऑनलाईनद्वारे किंवा धनादेशद्वारे मोठय़ा व्यावसायिकांना रक्कम देऊ शकतो. पण बँकेकडे रक्कम घेऊन जाताना पोलिसांकडून अडवणूक होत आहे. बँका सर्वसाधारण सकाळी 10 वाजता उघडल्या तरी त्यांचे व्यवहार साडेदहालाच सुरू होतात. त्यामुळे आम्हाला साडेदहानंतर बँकेत जावे लागते. त्यावेळी ही समस्या निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासनाने आम्हाला एक मिनीटही वेळ वाढवून देऊ नये. मात्र, सध्या असलेल्या वेळेमध्ये बदल करून पूर्वी दिलेली कालमर्यादाच ठरवून द्यावी, अशी मागणी बाजारपेठमधील व्यावसायिकांनी केली आहे.