अविश्वासावरील चर्चेवेळी राहिले गैरहजर : अविश्वास ठराव 7 विरुद्ध 0 मतफरकाने संमत ,न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सगलानी गटाला यश
प्रतिनिधी / डिचोली
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील साखळी नगरपालिकेवरील भाजपची सत्ता राखून ठेवण्यासाठी भाजपतर्फे आणि सरकारतर्फे करण्यात आलेले सर्व प्रयत्न अखेर फोल ठरले आहेत. या सुडाच्या आणि ‘हाय व्होल्टेज’ राजकारणात राज्यभर चर्चेत आलेल्या साखळी नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावावर काल शुक्रवारी चर्चा झाली. तो ठराव सत्ताधारी गटातील सर्व सहाही नगरसेवकांच्या अनुपस्थितीत संमतही झाला. धर्मेश सगलानी गटाला अखेर साखळी नगरपालिकेवरील भाजपची सत्ता खाली खेचण्यात यश आले. अविश्वास ठराव 7 विरुद्ध 0 अशा मतफरकाने संमत झाला.
गेल्या 20 मार्च रोजी साखळी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 9 मधील भाजपचे उमेदवार दशरथ आजगावकर यांना पराभूत करून सगलानी गटाचे राजेंद्र आमेशकर विजयी ठरल्यानंतर सगलानी गटाकडे थेट बहुमत आले होते. तरीही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने आपल्या राजकीय शक्तीचा वापर करीत अनेक शक्कली लढविल्या, पण अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपासमोर सरकारची एकही खेळी टिकू शकली नाही. प्रयत्नांची पराकाष्ट करूनही अखेर सत्तेची खुर्ची खाली करण्याची पाळी भाजप पालिका मंडळावर आली आहे.
राया पार्सेकर अपात्रताप्रकरणी न्यायालयाकडून दिलासा
नगरसेवक राया पार्सेकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकेला सगलानी गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाकडून त्यास स्थगिती देण्यात आली. तसेच डिचोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी गुन्हय़ाखाली पार्सेकर यांना अटकही होण्याची दाट शक्मयता होती. त्याविरुद्ध अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. सदर अर्जला न्यायालयाने मंजुरी दिल्याने त्यांची या बैठकीला उपस्थित राहण्याची वाट मोकळी झाली. त्यामुळेच सगलानी गटाचे सातही नगरसेवक बैठकीला उपस्थित राहू शकले.
अविश्वास ठरावावरील बैठकीस सत्ताधारी गट राहिला गैरहजर
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साखळी नगरपालिकेत काल शुक्रवारी दु. 2.30 वा. अविश्वास ठरावावर महत्वाची बैठक संपन्न झाली. बैठकीस सत्ताधारी गटातील नगराध्यक्ष यशवंत माडकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, रश्मी देसाई, ब्रह्मानंद देसाई व शुभदा सावईकर हे अनुपस्थित होते. अविश्वास ठराव दाखल करणाऱया गटातील नगरसेवक धर्मेश सगलानी, उपनगराध्यक्षा अन्सिरा खान, राया पार्सेकर, कुंदा माडकर, राजेश सावळ, ज्योती ब्लेगन व राजेंद्र आमेशकर हे सातहीजण उपस्थित होते. निर्वाचन अधिकारी म्हणून वाळपईचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर व साखळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक वायंगणकर यांची उपस्थिती होती.
अविश्वास ठराव 7 विरुद्ध 0 मतफरकाने संमत
अविश्वास ठरावावर चर्चा व मतदान प्रक्रिया हाती घेतली असता सत्ताधारी गटातील सर्व सहाही नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने निवड अधिकारी राजेश आजगावकर यांना त्यावर मतदान घ्यावे लागले नाही. त्यामुळे त्यांनी सदर अविश्वास ठराव 7 विरूद्ध 0 अशा मतफरकाने संमत झल्याचे जाहीर केले.
आमचे काय चुकले ते सांगावे : सगलानी
साखळी नगरपालिकेवर 2018 च्या निवडणुकीत लोकांनी आमच्या गटाला पूर्ण बहुमत देताना 13 पैकी 10 जागा निवडून दिल्या. त्या बळावर साखळी नगरपालिकेत सत्ता स्थापन करून आम्ही केवळ लोकसेवक म्हणून लोकांना सेवा दिली. तरीही भाजपने आमची सत्ता खाली खेचून मागीलदाराने आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर माजी नगरसेवक दामू घाडी यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या प्रभाग क्र. 9 मध्ये आमचा उमेदवार राजेंद्र आमेशकर निवडून आला. त्यामुळे आमच्या गटाकडे सात जणांचे पूर्ण बहुमत आले. ते सिध्द करण्यासाठी आम्हाला भयंकर त्रास भाजप सरकारने दिले. आमचे काय चुकले? लोकांची कामे व सेवा केली ती आमची चूक होती काय? पूर्ण बहुमत असतानाही आम्हाला बहुमत सिध्द करू न देणे हा कुठला न्याय आहे? हिच लोकशाही आहे का? सत्तेचा गैरवापर करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणे हेच मुख्यमंत्र्यांचे राज्याप्रती कर्तव्य आहे का? असे सवाल धर्मेश सगलानी यांनी यावेळी पत्रकारांसमोर बोलताना उपस्थित केले. आज साखळीत सत्याचा विजय झालेला आहे. असेही ते पुढे म्हणाले.
सांखळीतील जनतेने या आमदाराचा पराभव करावा : सगलानी
या लोकशाही प्रधान देशातील गोवा राज्यात आज लोकशाहीची सर्रास हत्या झालेली आहे. सरकारी यंत्रणांचा कसा गैरवापर करून आपलीच दहशत निर्माण करणे हे या मुख्यमंत्र्यांकडून शिकावे. आमच्या हक्कासाठी आज आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लगत आहे. गेले अनेक दिवस आम्हला या सरकारने भरपूर त्रास दिले. कोणी जर भाजप विरोधात फिरत असल्याचे दिसल्यास लगेच त्यांच्या नोकरी, धंद्यावर त्रास देणे. सरकारी कोणी नोकर असल्यास किंवा कुणाचेही नातलग असल्यास त्यांच्या बदल्या करणे, हे प्रकार आज चालू असून मुख्यमंत्र्यांनी साखळी मतदारसंघात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे गलिच्छ राजकारण पाहता भविष्यात नवीन पिढी राजकारणात येईल का? लोकशाही पायदळी तुडवून केवळ हुकूमशाही गाजवणारा असला आमदार यापुढे साखळीवासीयांना पाहिजे का? लोकांनी पुढील निवडुकीत विचार करावा. कोणालाही न घाबरता साखळीतील जनतेने या आमदाराच्या विरोधात मैदानावर उतरावे आणि त्याचा पराभव करून दाखवावा, असे आवाहन यावेळी धर्मेश सगलानी यांनी केले.
प्रमोद सावंताना पुढील निवडणुकीत घरी बसविणार : सावळ
साखळी नगरपालिकेच्या या राजकारणात मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिमा मलिन करून घेतली आहे. गेल्या दहा दिवसांत आमच्या गटातील नगरसेवकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावे लागले. मात्र आज सत्याचा विजय झाला आहे. आता या हुकुमशाह आमदाराला घरी बसविण्याची वेळ आली आहे. येणाऱया निवडणुकीत या फसव्या भाजप आमदाराला साखळीची जनता धडा शिकवणार आणि घरी बसविणार, अशी प्रतिक्रिया नगरसेवक राजेश सावळ यांनी व्यक्त केली.
जेवढे त्रास देणार, तेवढे आम्ही मजबूत होत जाणार : ब्लेगन
आज साखळीत घडलेली घटना इतिहासात नोंद करण्यासारखी असून अखेर सत्याचाच विजय झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम्हाला खुप त्रास दिले. मात्र आम्ही त्या त्रासांपुढे झुकले नाही. म्हणूनच आज आम्हाला यश प्राप्त झाले. मुख्यमंत्री आम्हला जितका त्रास देणार तितकेच आम्ही मजबूत होत जाणार. अशाचप्रकारे येणाऱया विधानसभा निवडणुकीत एकसंध राहून आम्ही डॉ. प्रमोद सावंत यांचा पराभव करणार आहोत. मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी नड्डा असणार, मात्र आमच्या सोबत देव आहे. आणि त्याच देवाने आज सत्य म्हणजे काय हे दाखवून दिले आहे. यापुढेही विजय हा सत्याचाच होणार, अशी प्रतिक्रिया यावेळी माजी सरपंच प्रवीण ब्लेगन यांनी व्यक्त केली.
भाजप सरकारचा अंत जवळ आल्याचे स्पष्ट : कामत

सांखळीचे भाजप समर्थक नगराध्यक्ष यशवंत माडकर यांचा शुक्रवारी झालेला 7-0 मतांच्या फरकाचा दारुण पराभव म्हणजे भाजप सरकारचा अंत जवळ आल्याचे स्पष्ट द्योतक आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. माननीय उच्च न्यायालयाने आज परत एकदा लोकशाही वाचवली आहे. मुख्यमंत्र्यांनी गैरमार्गाने केलेले सर्व प्रयत्न वाया गेले व शेवटी सत्याचाच विजय झाला. भाजप राजवटीत आज लोकांना आपले घटनात्मक अधिकार व लोकशाही वाचविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात हे दुर्देवी आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने लोकांचा न्याय संस्थेवरील विश्वास परत एकदा बळकट झाला आहे. सांखळी नगरपालिकेच्या सर्व सात नगरसेवकांचे आपण अभिनंदन करतो. त्यांनी राखलेली एकी व दाखवलेल्या धैर्याचे आपण कौतुक करतो. न्यायालयीन लढा लढणारे धर्मेश सगलानी यांचे विशेष अभिनंदन, असेही कामत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री, नगरविकासमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : ढवळीकर

सांखळी पालिका प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दोघा नगरसेवकांना अपात्र करु पाहणारे नगरविकासमंत्री मिलिंद नाईक या दोघांनीही पदाचे राजीनामे देऊन लोकशाहीचा मुडदा पाडणाऱयांनी प्रायश्चित घ्यावे, अशी मागणी मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला की, तुमच्या राजकीय कारस्थानांपासून राज्याचे नाव बदनाम झालेले आहे. सांखळीची जनता तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा स्वतःहून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन लोकशाही मजबुतीला सहकार्य करावे. सांखळी प्रकरणात मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री सहभागी असल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन आपापल्या पदांचे राजीनामे द्यावेत, असे ते म्हणाले.
सूडनाटय़ मुख्यमंत्र्यांच्या अंगलट : गोवा फॉरवर्ड
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतःच्या मतदारसंघातील सांखळी पालिका ताब्यात घेण्यासाठी चालविलेले सूडनाटय़ त्यांच्याच अंगलट आले असून या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली आहे.
सांखळी पालिकेत येनकेन प्रकारेण सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जीव तोडून खटाटोप केला. हा प्रश्न त्यांनी प्रतिष्ठेचा बनविला. परंतु अखेर सगलांनी गटानेच बाजी मारत पालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. खरेतर न्यायव्यवस्थेनेच मुख्यमंत्र्यांना ही सणसणीत चपराक दिली आहे व मुख्यमंत्र्यांचा हा पराभव समस्त गोमंतकीय जनतेने पाहिला आहे. यातून मुख्यमंत्र्याना राजकीय नैतिकताच नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे, अशी मागणी कामत यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनो, सत्तेसाठी एवढी लाचारी बरी नव्हे : फळदेसाई

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अक्षरशः लोकशाहीचा खून केला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःला आवरायला हवे, सत्तेसाठी एवढी लाचारी बरी नाही. न्यायालयाने स्थगिती आदेश दिले तरी, मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात काही शिस्त नाही असे चित्र आहे. अशी लाचारी करणाऱया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा निषेध नव्हे तर जाहीरपणे धिक्कार करतो असे गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी म्हटले आहे.
साखळी नगरपालिकेतील सत्ता राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अतिशय खालची पातळी गाठली आहे. त्यांना नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचाही पाठींबा आहे. त्यांचाही गोवा सुरक्षा मंचतर्फे आम्ही तीव्र निषेध करतो असे फळदेसाई यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा व त्यांना सहकार्य करणाऱया नगरविकास मंत्र्यांचा जाहीर धिक्कार करत आहोत. एवढं करूनही जर मुख्यमंत्र्यांवर नामुष्कीच ओढवलेली असल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी फळदेसाई यांनी केली आहे.