नवीन वर्षाचा स्वागतोत्सव साजरा झाला की, वेध लागतात ते वर्षातील पहिल्या सणाचे, मकर संक्रांतीचे. खाण्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद, आप्तेष्टांची भेट, हळदी कुंकवाच्या निमित्ताने शेजाऱयांची भेट, लहान मुलांना बोरन्हाणं, पतंगोत्सव अशा सर्व प्रकारे आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते. याचसोबत मकरसंक्रमणाचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो, या वेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा, विशेष गंगास्नान, दान धर्म केला जातो. महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. संक्रांतीचा आदल्या दिवशी भोगी, संक्रात आणि नंतर किंक्रांत. पाहूया यांचे महत्व…
संपूर्ण भारतात संक्रांतीचा दिवस मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो. दक्षिणेत पोंगल तर, उत्तरेत लोहारी, बिहू या नावे हा सण साजरा होतो. या दिवशी संक्रांतीची पूजा केली जाते. संक्रांतीला जमिनीवर सूर्याची आकृती काढून तिच्या मध्यभागी सूर्य प्रतिमेची स्थापना व पूजा करणे व दोन शुभ्र वस्त्रांचे दक्षिणेसहित दान करणे हा या व्रताचा विधी आहे. कीर्ती, राज्यभोग, आरोग्य व दीर्घायुष्य यांचा लाभ या व्रतामुळे होतो असे व्रतराज या ग्रंथात म्हटले आहे.
या दिवशी स्त्रिया मृत्तिका घटाचे वाण देतात. एकत्र येऊन हळदीकुंकू करतात; विविध वस्तूंचेही वाण या दिवशी लुटले जाते. एकमेकांना तिळगुळ वाटतात. नात्यामध्ये असलेली कटुता दूर करून पुन्हा नव्याने नात्यात गोडवा निर्माण करण्याचा हा दिवस आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी अनेक भाविक गंगास्नान करतात. मकरसंक्रातीपूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते.आणि हा सूर्यदेव तापायलाच तयार नसतो! तो तयार होतो ते या मकरसंक्रातीपासून!
राज्यनिहाय नावे
मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि पद्धतीने साजरी केली जाते जसे मकरसंक्रात (महाराष्ट्र), पोंगल (तामिलनाडु), उत्तरायण (गुजरात व राजस्थान), लोहढी (पंजाब),माघमेला (ओडिसा), भोगाली बिहु (आसाम), संक्रांती (कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, बिहार). प्रत्येक धर्म आपापल्या प्रथांप्रमाणे या दिवसाला साजरा करत असले तरीदेखील आनंद, उत्साह, जल्लोष हा सगळीकडे असतोच असतो.
कधी येते मकरसंक्रांत
मकरसंक्रांत या सणाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो (कधीतरी या सणाला 13 किंवा 15 जानेवारीला आल्याचे आपण पाहातो पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी 14 जानेवारीला येतो) पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे.
शेती आणि सौरकालगणनेशी संबंध
हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे. मकरसंक्रांतीपासून हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते (मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी हळदीकुंकवाचे आयोजन करतात.) असं म्हणतात की या रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात.
मकरसंक्रांतीचे आहारदृष्टय़ा महत्व
मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगडाचे वाण देतात. या वाणात हरभरे, मटर, बोरं, उस, गहू, तीळ, नाणे, असल्याचे आपण पाहातो. (हरभरे, मटर, बोरं, गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पहायला मिळतो) पंढरपुरच्या रूक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया आजच्यादिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्व आहे. या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो असा एक समज आहे. संक्रांतीचा सण हा आरोग्याशी निगडीत आहे. चांगलेचुंगले, पौष्टिक खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. ‘एकमेकांशी गोड बोला’ असा संदेश या सणातर्फे दिला जातो.