राज्यपातळीवरील नेत्यांकडून रसद, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यात खलबते
कोल्हापूर / संजीव खाडे
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात दिवसें दिवस काँग्रेस नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा वाढत असलेला प्रभाव रोखण्यासाठी भाजपच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. प्रदेश भाजपकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाटील यांचा वारू रोखण्यासाठी तगडा आणि प्रभावी उमेदवार देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले असून संपूर्ण जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपने प्लॅन तयार करण्याचे काम सुरू केले असून फडणवीस यांनीही चंद्रकांतदादा यांच्याबरोबर खलबते केल्याची माहिती पुढे येत आहे.
2015 पासून सतेज पाटील यांचा राजकारण आणि सत्ताकारणातील प्रवास वेगवान राहिला आहे. 2014 मध्ये विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांनी 2015 मध्ये कोल्हापूर महापालिकेवर राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेसची सत्ता आणली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पराभूत करून ते स्वतः विधानपरिषदेवर निवडून गेले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मित्र पक्षात असणारे आपले विरोधक धनंजय महाडिक यांच्या पराभवात वाटा उचलताना शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना साथ दिली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे चार आमदार निवडून आणले, राष्ट्रवादीलाही बळ दिले.
या निवडणुकीत भाजप जिल्ह्यात शून्य झाली. त्यांचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. राज्यात अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पाटील यांना गृहराज्यमंत्रीपद, पालकमंत्रीपद लाभले. आपल्या राजकीय शक्तीशक्तीचा वापर करत त्यांनी भाजपकडून जिल्हा परिषद काँग्रेसकडे खेचून आणली. महाडिक यांच्याकडून गोकुळ दूध संघ ताब्यात घेतला. पाटील यांच्या वाढत्या प्रभावाचा विरोधकांसह भाजपलाही फटका बसला. त्यातून त्यांचे विरोधक वाढू लागले आहेत. पाटील यांच्या राजकीय विरोधकांना नामोहरण करण्याच्या पद्धतीनेमुळेही स्वपक्षीयांबरोबर विरोधी पक्षातीलही अनेक जण दुखावले गेले. महाडिक यांच्याबरोबर असणारा त्यांचा राजकीय संघर्षही आणखी तीव्र झाला आहे. अशा वातावरणात होणारी विधानपरिषदेची निवडणुक भाजपकडून काटे की टक्कर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.
देवेंद्र फडणवीस आग्रही
राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. कोल्हापूरमध्ये भाजपला विजय हवा आहे. सतेज पाटील यांना नमवयाचे असेल तर महाडिक यांच्यातील उमेदवार देण्यासंदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह असून रसद पुरविण्याची तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येते.
दुखवलेल्यांना जवळ करण्याचे प्रयत्न
राजकारणात सतेज पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या दुखावलेल्या नेते, पदाधिकारी, जि. प. सदस्य, नगरसेवक, जवळ करण्यासाठी भाजपने जाळे टाकण्यास सुरूवात केली आहे.
चंद्रकांतदादा यांना संधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात सध्या भाजप बॅकफूटवर आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळे विधानपरिषद जिंकून भाजपचे झेंडा फडकविण्याची चंद्रकांतदादांना संधी आहे. ते कसे प्रयत्न करतात, यावर भाजप उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.