भाजपतर्फे रमेश तवडकर, विरोधकांतर्फे आलेक्स सिक्वेरा
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील विधानसभेसाठी सभापतींची निवड मंगळवारी होणार असून सोमवार दुपारपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. काल रविवारी भाजपाच्या वतीने आमदार रमेश तवडकर यांनी विधानसभा सचिवांकडे अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेस पक्षातर्फे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी अर्ज दाखल केला आहे. सध्या स्थितीत भाजपाकडे 25 आमदार तर काँग्रेसकडे 15 आमदार असल्याचे चित्र आहे. मंगळवारी होणाऱया सभापती निवडणुकीत चित्र स्पष्ट होणार आहे.
भाजपाकडे पूर्णबहुमत असल्याने भाजपचे रमेश तवडकर हेच सभापती होतील असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला आहे. अर्ज दाखल करून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांशी बोलत होते. आमदार तवडकर यांच्यावतीने तीन अर्ज दाखल करण्यात आले असून पहिल्या अर्जासाठी अपक्ष आमदार आलेक्स रेजीनाल्ड सूचक असून आमदार सुभाष फळदेसाई यांनी अनुमोदन दिले आहे. दुसऱया अर्जासाठी आमदार सुभाष शिरोडकर हे सूचक असून आमदार आलेक्स रेजीनाल्ड यांनी अनुमोदन दिले आहे. तर तिसऱया अर्जासाठी आमदार जेनिफर मोन्सेरात या सूचक असून आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी अनुमोदन दिले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सांवत यांनी सांगितले.
भाजपाचे 20 आमदार तसचे तीन अपक्ष व दोन मगो पक्षाचे आमदार मिळून एकूण 25 आमदारांचे संख्यबळ भाजपाकडे आहे. याशिवाय आणखीन दोन ते तीन आमदार भाजपाच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. एकूणच भाजपचे आमदार रमेश तवडकर हेच सभापती म्हणून निवडून येतील यात शंकाच नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
काँग्रेसतर्फे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केल्याचे काँग्रेसचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले. आरजी, गोवा फारवर्ड तसेच आपचे दोन आमदार काँग्रेस सोबत असल्याचे मायकल म्हणाले. काँग्रेसच्या आमदारांची सभा झाल्यानंतर ते पत्रकरांशी बोलत होते. या सभेत आपचे आमदारही उपस्थित होते. गोवा आणि गोमंतकीयांचे प्रश्न उचलून धरण्यासाठी एक सक्षम विरोधक म्हणून एकजूटीने काम करणार असल्याचे मायकल लोबो यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेता म्हणून काम करायला आपण इच्छूक आहात काय? असा प्रश्न विचारला असता मायकल लोबो म्हणाले, विरोधी पक्षनेता हा दिल्लीत ठरणार असून आपल्याला ती संधी मिळाल्यास नक्कीच सार्थक करणार. गोमंकीयांचे अनेक प्रश्न आहेत. अनेक आमदारांनी ते विधानसभेत मांडले होते. तेच प्रश्न पुन्हा उचलून धरणे गरजेचे आहे, असे मायकल लोबो यांनी सांगितले. महागाईचे चटके प्रत्येक सामान्य माणसाला लागत असून तो होरपळला जात आहे. याच्यावर उपाययोजना करणे महत्वाचे आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस या मध्यमवर्गियांच्या गरजा आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना लागणाऱया वस्तूंचे दर वाढणार नाही याकडे सरकारने लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे, असेही मायकल लोबो म्हणाले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास जो दंड दिला जातो त्यातही भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वास्तविक ही सर्वसामान्य जनतेची सतावणूक आहे. दंडाची रक्कम वाढविण्याचे आपण सरकारात असताना ठरले होते. मात्र आपण त्याला विरोध करून तो प्रस्ताव स्थगीत ठेवण्यास सरकारला भाग पाडले होते, असेही मायकल लोबो म्हणाले. वाढीव रक्कमेची अमंलबजावणी करण्याअगोदर सरकारने पुन्हा नीट विचार करणे गरजेचे आहे. कारण दंड भरणारे अधिकाधिक लोक हे मध्यमवर्गीय असतात आणि त्यानाच हा त्रास सोसावा लागतो, असेही मायकल लोबो यांनी सांगितले.