मुंबई/प्रतिनिधी
आर्यन खान (Aryan Khan)ड्रग्ज प्रकरणात (drugs case) पंच असलेल्या प्रभाकर साईलनं (prabhakar sail) रविवारी माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यासह किरण गोसावींवर अनेक गंभीर आरोप केले होते. साईलने आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय. यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने केला होता. यावेळी त्याने सॅम या व्यक्तीचे नाव घेतले होते. आता पंच प्रभाकर साईल यांनी मोठे खुलासे केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. त्यानंतर एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही असा निशाणा त्यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर साधला आहे.
यावेळी राऊत यांनी “सुशातसिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणापासून राज्यात एक चित्र निर्माण केले आहे. महाराष्ट्रात फक्त चरस, गांजा, अफू, याचेंच पीक निघते. मुंबईची चित्रपट सृष्टी (mumbai film city) ही महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला, मराष्ट्रातल्या काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर बोट ठेवले आहे. गुजरातच्या बंदरावर २५ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले त्याची बातमी होत नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नवाब मलिक (Nawab Malik) जे मांडत आहेत हे पाहिल्यावर स्पष्ट दिसते की काहीतरी गडबड आहे. याचे पुरावे आता समोर आले आहेत. बॉलीवूड कलाकाराकडून खंडणी मागण्यासाठी हे क्रूझ पार्टी प्रकरण केले की काय?,” असे संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
-“भाजपाच्या लोकांना याविषयी बोलताना असे वाटते की ते आकाशातून पडले आहे. सगळे व्हिडीओ, पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करावी असे माझे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करावी अशी मागणी होत आहे. पण हे केंद्रीय तपास यंत्रणांचे जे लोडणं आमच्या गळ्यात मारले आहे ते काढले पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.
