एका डॉलची किंमत 1300 रुपये , 2030 पर्यंत 100 टक्के प्लास्टिकने तयार होणार
समुद्रातील प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या पुढाकारात बार्बी डॉल तयार करणारी मैटल कंपनीही सामील झाली आहे. कंपनीने अलिकडेच स्वतःचे नवे कलेक्शन सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये तीन बार्बी डॉल असून त्यांची निर्मिती समुद्रातून गोळा करण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱयाचा पुनर्वापर करत झाली आहे.
बार्बी डॉलचा 90 टक्के हिस्सा पुनर्वापर करण्यात आलेल्या कचऱयापासून निर्माण करण्यात आला आहे. 2030 पर्यंत हा आकडा 100 टक्क्यांपर्यंत नेण्यात येईल आणि उत्पादन आणि पॅकिंगमध्येही प्लास्टिकच्या कचऱयाचा वापर करण्यात येणार असल्याचे मैटल कंपनीने म्हटले आहे.
डॉलमध्ये 90 टक्के समुद्रातील प्लास्टिक कचरा आणि 10 टक्के वर्जिन प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. वर्जिन प्लास्टिकच्या मदतीने शिर आणि केस तयार करण्यात आले, जेणेकरून त्याचा लुक पूर्वीसारखाच असावा. हे कलेक्शन 2 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होईल. एका डॉलची किंमत 1300 रुपये असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
ओशियन बीच थीम
बार्बीच्या नव्या कलेक्शनचे नाव ‘बार्बी लव्ह्ज द ओशियन’ आहे. यातील तिन्ही बार्बी डॉल्सना समुद्र किनाऱयाच्या थीमनुसार तयार करण्यात आले आहे. मागील 62 वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. मुलांना चांगला संदेश देण्याचा असा पुढाकार आम्ही सुरूच ठेवणार आहोत. नवे कलेक्शन याच पुढाकाराचे एक उदारहण असल्याचे कंपनीच्या उपाध्यक्षा लीसा मॅकनाइट यांनी म्हटले आहे. आम्ही मोठय़ा स्तरावर मुलांना या बदलाचा हिस्सा करू इच्छितो कारण मुलांना त्यांना हवे तसे जग पाहता यावे असेही त्यांनी नमूद केले आहे.
जुन्या खेळण्यांवरही होणार प्रक्रिया
मैटलने टॉय रिटर्न कार्यक्रम सुरू केले आहे. यानुसार जुन्या खेळण्यांवर प्रक्रिया करून नवी खेळणी तयार करण्यात येणार आहेत. यातून प्लास्टिक कचऱयात घट होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.