दिगंबर कामत, गिरीश चोडणकर यांचा आरोप : युवक काँग्रेसची दक्षता विभागाकडे तक्रार

प्रतिनिधी /पणजी
भाजपच्या काळातील सरकारी नोकरभरतीत रु. 1000 कोटीपेक्षा जास्त रकमेचा महाघोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला असून तो मध्यप्रदेशातील ‘व्यापम’ घोटाळय़ापेक्षाही मोठा असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
काल सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हा आरोप करून पुढे सांगितले की प्रामाणिक आणि गुणवान उमेदवारांवर हा अन्याय असून तो खपवून घेतला जाणार नाही. या अशा भ्रष्टाचारी नोकर भरतीमुळे गरजू, पात्रता असलेले उमेदवार निराश झाले असून अपात्र आणि लाच देणारे उमेदवार निवडण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.
भाजप आमदाराकडून घोटाळा उघड
आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंता भरतीत प्रत्येकी रु. 25 ते 30 लाख घेण्यात आल्याचा उघड आरोप केला असून तो घोटाळा रु. 70 कोटीचा असल्याचे समोर आणले आहे. सरकारमधील आमदारच या घोटाळय़ाविरोधात आवाज उठवत असून ठराविक मतदारसंघातील उमेदवारच निवडले जातात यावरून ते सिद्ध होते असे चोडणकर म्हणाले. सर्व खात्यातील नोकरभरतीचा हिशोब केला तर या घोटाळय़ात रु. 1000 कोटीपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा चोडणकर यांनी केला.
लेखी परीक्षा हे फक्त नाटक
लेखी परीक्षा हे फक्त नाटक असून नोकऱयांचा लिलाव करण्यासाठीच नोकर भरती करीता हा परीक्षेचा फार्स करण्यात आला आहे. सध्याची नोकरभरती त्वरित रद्द करावी आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत भरती करण्यात यावी अशी मागणी कामत व चोडणकर यांनी केली. सरकारी खात्यात 15 ते 20 वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱयांना प्रथम नोकरीत घेण्याची गरज त्यांनी वर्तवली. त्या कर्मचाऱयांना तसेच ठेवून नवीन उमेदवारांची भरती करणे धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.
युवक काँग्रेसची दक्षता विभागाकडे तक्रार
गोवा प्रदेश युवक काँग्रेस समितीने सध्या राज्यात सुरू असलेल्या नोकरी विक्री घोटाळय़ा संदर्भात दक्षता संचालकांकडे तक्रार केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील तांत्रिक सहाय्यक आणि कनि÷ अभियंता पदांच्या भरती प्रक्रियेत झालेल्या हेराफेरीच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी याआधी ही पदे रद्द न केल्यास तक्रार करण्याचा इशारा दिला होता. सोमवारी ऍड. म्हार्दोळकर यांच्यासह, अखिलेश यादव, साईश आरोसकर, जनार्दन भंडारी, हिमांशू तिवरेकर आणि व्यास प्रभू चोडणकर यांनी दक्षता विभागात तक्रार दाखल करून परीक्षेत फेरफार आणि नोकऱयांची विक्री करणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज्यपालांनी नोकरभरती थांबवावी
सरकारी नोकरभरतीत घोटाळा झाल्यामुळे हस्तक्षेप करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे केली असून तसे निवेदन त्यांना सादर केले आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या सहीने ते निवेदन देण्यात आले आहे. त्यात तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. नोकरभरतीची सीबीआय चौकशी व्हावी, 15 ऑक्टोबर 2019 नंतरची नोकरभरती रद्द करावी आणि कर्मचारी निवड आयोगातर्फे (स्टाफ सिलक्शन कमिशन) नोकरभरती करावी या मागण्यांचा त्यात समावेश आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते, वजन-माप खाते, गोवा मेडिकल कॉलेज, पोलीस, आरोग्य खाते अशा विविध सरकारी खात्यात नोकरभरती चालू असून ती बेकायदेशीर आहे. लेखी परीक्षेत मंत्र्याचे कर्मचारी 100 गुण घेतात आणि निवड झालेल्यांच्या यादीत येतात. इतर शिक्षित व पात्र उमेदवार नापास होतात, असेही काँग्रेसने निवेदनातून राज्यपालांच्या निदर्शनास आणले. बांधकाम खात्यातील नोकरभरतीत प्रत्येकी रु. 25 ते 30 लाख घेतले असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने करुन त्यात रु. 70 कोटींचा घोटाळा झाल्याचे म्हटल्याचे निवेदनात नमूद केले आहे. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, अमरनाथ पणजीकर यांची यावेळी उपस्थिती होती.