पोलीस कोठडीत घेवून केली चौकशी, मोबाईल शोरुममध्येही करतात चोरी
प्रतिनिधी / बेळगाव
ग्राहक असल्याचे भासवून खडेबाजार येथील कल्याण ज्वेलर्समधून पाच तोळय़ाची चेन लांबविल्या प्रकरणी खडेबाजार पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. हुबळी उपकारागृहातून पोलीस कोठडीत घेवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली असून बेंगळूर, हुबळी-धारवाड, बेळगावसह अनेक ठिकाणी या जोडगोळीने गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
विरक्तानंद उर्फ संतोष महादेवाप्पा कटगी (वय 38, रा. अशोकनगर, हुबळी), शरत श्रीकांत कारंत (वय 37, रा. गदग) अशी त्यांची नावे आहेत. ही जोडगोळी बेंगळूर येथे पोलिसांना सापडली होती. हुबळी येथेही गुन्हे केल्यामुळे हुबळी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. हुबळी उपकारागृहातून पोलीस कोठडीत घेवून खडेबाजार पोलिसांनी या जोडगोळीची कसून चौकशी केली आहे.
पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी त्यांची चौकशी केली. या संबंधी कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापक सोमू पी. एस. यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. रविवार दि. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कल्याण ज्वेलर्समध्ये जावून ग्राहक असल्याचे भासवून पाच तोळय़ाची चेन लांबविण्यात आली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.
या भामटय़ांनी चेन दाखविण्यास सांगितली. कर्मचाऱयाने चेन असलेला ट्रे त्यांच्या समोर ठेवला. त्यामधील 47.52 ग्रॅम वजनाची एक चेन घेवून कर्मचाऱयाची नजर चुकवून एका भामटय़ाने ते आपल्या गळय़ात घातली. आधीच आपल्या गळय़ात घालून आलेली त्याच आकाराची बनावट चेन ट्रेमध्ये ठेवून भामटे तेथून पसार झाले होते.
केवळ सराफी दुकानातच नव्हे तर मोबाईल शोरुममध्ये घुसून ग्राहक असल्याचे भासवत मोबाईल संच पळविण्यातही हे दोघे तरबेज आहेत. एका हुबळीत या दोघा जणांनी मोबाईल शोरुममधून 15 मोबाईल पळविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक धिरज शिंदे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.