भ्रष्टाचार निर्मूलन सामाजिक संस्थेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
कोविड-19 या संसर्गामुळे दिवसेंदिवस परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली असून त्यांच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने रेमडेसिवीरचा उपयोग करावा लागणार आहे. मात्र, ते इंजेक्शन बाजारपेठेत उपलब्ध नाही. बाजारामध्ये हे इंजेक्शन मिळत नाही. तसेच सर्वसामान्यांना इंजेक्शन घेणे परवडणारे नाही. तेव्हा सरकारी खर्चामध्येच हे इंजेक्शन रुग्णांना द्यावे आणि ते उपलब्ध करावे, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन सामाजिक संस्था, बेळगाव यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हय़ामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. मात्र, बऱयाच ठिकाणी रेमडेसिवीरचे इंजेक्शन उपलब्ध नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. तेव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन हे इंजेक्शन उपलब्ध करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. नामदेव मोरे, राहुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, जिल्हा पंचायत माजी सदस्य नागेश देसाई, पवन देसाई, धाकलु ओऊळकर, डॉ. तानाजी पावले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.