अन्य 150 कर्मचाऱयांचे अहवालही पॉझिटिव्ह
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना कोरोनाची लागण झाल्याची संख्या 4 झाली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयातील अनेक कर्मचारीही या साथीच्या विळख्यात सापडले आहेत. सर्वोच्च न्यायालयात 3000 कर्मचारी आहेत. त्यापैकी 150 कर्मचाऱयांचा अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आला आहे. दिल्लीत नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रविवारी 22,751 नवीन रुग्ण आढळले, त्यापूर्वी शनिवारी 20,181 नवीन रुग्ण आढळले होते.
दिल्लीत कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाटय़ाने वाढ होत असल्याचे पाहून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी 2 जानेवारी रोजी केवळ व्हर्च्युअल सुनावणीद्वारेच सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते. ही व्यवस्था 3 जानेवारीपासून पुढील दोन आठवडय़ांसाठी लागू करण्यात आली. यादरम्यान न्यायाधीशांना त्यांच्या घरूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यास सांगण्यात आले. ही सर्व कसरत न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱयांना कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी करण्यात आली.
डॉ. रणदीप गुलेरिया विलगीकरणात
दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनाही सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचा वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. डॉ. गुलेरिया यांच्या कार्यालयातही अनेक जण संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. याशिवाय दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी चिन्मय बिस्वाल यांच्यासह 1000 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिल्ली पोलिसांनी एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
देशात नवीन रुग्णांची संख्या 1.80 लाखांवर
देशात कोरोना साथीच्या तिसऱया लाटेत सलग चौथ्या दिवशी दररोज 1 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तिसऱया लाटेत प्रथमच दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 1.80 लाखांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत संसर्गाचे 1 लाख 79 हजार 723 नवीन रुग्ण आढळले 146 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी देशात 1 लाख 59 हजार तर शुक्रवारी 1 लाख 41 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली होती. 46 हजार 569 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. झपाटय़ाने होणाऱया रुग्णवाढीमुळे सकारात्मकता दर 13.29 टक्के वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 3.57 कोटी लोकांना या महामारीचा फटका बसला आहे. यापैकी 3.44 कोटींहून अधिक लोक बरे झाले आहेत. सध्या देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाख 23 हजार 619 आहे. या महामारीमुळे आतापर्यंत 4 लाख 83 हजार 936 लोकांचा मृत्यू झाला आहे.