मंत्र्यांना खुश ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न : प्रत्येकाकडे किमान तीन खाती,राणे यांच्याकडे पाच तर काब्रालांकडे चार

प्रतिनिधी /पणजी
- विश्वजित राणेंकडे आरोग्यासह तब्बल पाच खाती
- काब्राल यांच्याडे सर्वांना भुरळ पाडणारे साबांखा
- ‘लाईम लाईट’चे कला-संस्कृती गोविंद गावडेंकडेच
- माविन गुदिन्हो यांच्याकडे वाहतुकीसह उद्योग खाते
- फोंडय़ांचे रवी पात्रांव बनले गोव्याचे कृषीमंत्री
- बाबूशनी स्वीकारली कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी
- जबरदस्त ग्लॅमरचे पर्यटन खाते रोहन खंवटेंकडे
- जलस्रोतसह सहकार खाते सुभाष शिरोडकरांकडे
आज उद्या करत तब्बल आठवडाभर लांबणीवर पडलेले सरकारचे खातेवाटप अखेर काल रविवारी करण्यात आले. मंत्रिमंडळ विस्ताराची वाट न पाहता विद्यमान आठ मंत्र्यांना खाती वाटण्यात आली. यातील सर्वात महत्वाचे गृह आणि वित्त खाते मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवले असून दुसऱया क्रमांकावर असलेले विश्वजित राणे यांना पाच महत्वाची खाती देण्यात आली आहेत. वीज, शिक्षण ही खाती अद्याप कुणालाही देण्यात आलेली नाहीत. विस्तारित मंत्रिमंडळातील मंत्र्यांना ही खाती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सर्वसाधारण प्रशासन विभागाचे अवर सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी रविवारी सायंकाळी खातेवाटपासंबंधी अधिसूचना जारी केली. खातेवाटपाबाबत एवढे दिवस कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे जनतेतही उत्कंठा वाढीस लागली होती तसेच वेगवेगळ्या चर्चांनाही ऊत आला होता. रविवारी झालेल्या खातेवाटपानंतर त्या सर्व चर्चा आणि शंकांचे निरसन झाले आहे.
बहुतेक सर्वांना आवडीची खाती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृह आणि वित्त या महत्वपूर्ण खात्यांसह दक्षता, राजभाषा ही खाती स्वतःकडे ठेवली आहेत. त्याशिवाय वाटप न झालेली उर्वरित खाती सध्या त्यांच्याकडेच राहणार आहेत. विद्यमान खातेवाटपात काही मंत्र्यांना त्यांची प्रिय असलेली गत सरकारातील खातीच देण्यात आली असून काही अतिरिक्त खात्यांचीही भेट देण्यात आली आहे.
विश्वजित राणेंकडे तब्बल पाच खाती
विश्वजित राणे यांना त्यांच्या आवडत्या आरोग्य तसेच महिला व बालविकास या खात्यांसह नगर विकास, नगरनियोजन, तसेच वन ही अन्य वजनदार खातीही देण्यात आली आहेत.
उद्योग खाते माविन गुदिन्होंकडे
असाच प्रकार माजी मंत्री माविन गुदिन्हो यांच्याबाबत घडला असून वाहतूक तथा पंचायत आणि शिष्टाचार ही तिन्ही खाती स्वतःकडेच ठेवण्यात त्यांनी यश मिळविले आहे. त्याशिवाय त्यांना उद्योग खातेही देण्यात आले आहे.
कला-संस्कृती गोविंद गावडेंकडेच
गोविंद गावडे यांना पूर्वीचेच कला व संस्कृती खाते आणि त्याच्या बरोबरीने क्रीडा खातेही देण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना ग्रामविकास खात्याचे मंत्रीपदही मिळाले आहे.
फोंडय़ांचे पात्रांव बनले कृषीमंत्री
भाजपात प्रवेश करून प्रथम आमदार व आता मंत्रीही बनलेले ’फोंडय़ाचे पात्रांव’ रवी नाईक यांना खरे तर साबांखा मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतु तो चुकला आहे. त्यांना कृषी, नागरी पुरवठा आणि हस्तकला ही खाती देण्यात आली आहेत.
कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी बाबूशकडे
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना गत सरकारात त्यांच्या पत्नीकडे असलेली महसूल व मजूर ही दोन्ही महत्वाची खाती देण्यात आली आहेत. त्याशिवाय कचरा व्यवस्थापन हे आणखी एक महत्वाचे खाते त्यांच्या पदरी पडले आहे.
नीलेश काब्राल यांच्याडे साबांखा
अनेकांना भूरळ घालणारे सार्वजनिक बांधकाम खाते अखेर नीलेश काब्राल यांना बहाल करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांची पूर्वीची कायदा, पर्यावरण ही खाती त्यांना मिळाली आहेत. त्याचबरोबर विधीमंडळ कामकाज खातेही त्यांना देण्यात आले आहे. पूर्वी काब्राल यांच्याकडे असलेले वीज खाते सध्यातरी मंत्र्याच्या प्रतीक्षेत आहे. शिक्षण हे अन्य एक महत्वाचे खातेही सध्या कुणालाच देण्यात आलेले नाही.
रोहन खंवटे बनले आयटी मंत्री
आयटी खात्याचा दांडगा अनुभव असलेले रोहन खंवटे यांना पुन्हा तेच खाते देण्यात आले असून त्यांच्या जोडीने पर्यटन हे जबरदस्त मागणी असणारे खाते आणि प्रिन्टिंग-स्टेशनरी या खात्यांचाही ताबा देण्यात आला आहे.
सहकार खाते सुभाष शिरोडकरांकडे
भाजपच्या उमेदवारीवर दुसऱयांदा विजयी झाल्यानंतर प्रथमच मंत्रीपद प्राप्त झालेले शिरोडाचे आमदार सुभाष शिरोडकर यांना सहकार हे महत्वाचे खाते, तसेच जलस्रोत आणि प्रोव्हेदोरिया ही खातीही देण्यात आली आहेत.
दरम्यान, सरकारच्या मागे सावलीप्रमाणे फिरणारी एकएका विषयांची ‘प्रतीक्षा’ अद्याप पाठशिवणीचा खेळ खेळत असून खातेवाटपानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होऊ लागली आहे. हा विस्तार बहुतेक आज म्हणजेच सोमवारी होईल असा अंदाज यापूर्वी वर्तविण्यात येत होता. परंतु काल सायंकाळपर्यंत त्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नव्हती. सुदिन ढवळीकर, आलेक्स लॉरेन्स, नीळकंठ हळर्णकर, गणेश गावकर, ज्योशुआ डिसोझा, जीत आरोलकर, उल्हास तुयेंकर यांच्यामधील तिघांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. परंतु ते तिघे कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे नशिबावर हवाला ठेऊन प्रतीक्षा करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहिलेला नाही.