उद्या शेवटची चाचणी होणार, ते अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडूंना सरावाची परवानगी
दुबई / वृत्तसंस्था
सर्व खेळाडू व सहायक पथकातील सदस्यांचा तिसऱया कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने चेन्नई सुपरकिंग्स प्रँचायझीला मोठा दिलासा लाभला. मागील काही दिवसात प्रचंड ताणतणावात असलेल्या चेन्नई पथकातील सर्व सदस्यांचे चाचणीसाठी सोमवारी नमुने घेण्यात आले होते. त्याचा मंगळवारी अहवाल आला.
मागील आठवडय़ात दीपक चहर व ऋतुराज गायकवाड हे खेळाडू कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने व त्यातच सुरेश रैनाने ‘वैयक्तिक कारणास्तव’ दुबई सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याने चेन्नईच्या गोटात ताणतणावाचे, चिंतेचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर चेन्नईसाठी खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह येणे स्वागतार्ह आहे.
सोमवारी चाचणीसाठी नमुने दिल्यापासून त्याचे अहवाल काय येणार, याबद्दल चेन्नईच्या पथकातील प्रत्येक सदस्यात चिंता होती. पण, सर्व सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आणि अर्थातच त्यांचा जीव भांडय़ात पडला. चेन्नईच्या पथकातील सदस्यांची आणखी एक चाचणी उद्या दि. 3 रोजी घेतली जाईल आणि याचे अहवालही निगेटिव्ह आले तर खेळाडूंना दि. 5 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सरावासाठी मैदानात उतरता येणार आहे. अर्थात, चहर व ऋतुराज यांना क्वारन्टाईन रहावे लागणार असून किमान दि. 12 सप्टेंबरपर्यंत ते उपलब्ध होऊ शकणार नाहीत.
प्लेसिस, लुंगी दुबईत दाखल
दरम्यान, चेन्नई संघातील खेळाडू फॅफ डय़ू प्लेसिस व लुंगी एंगिडी दुबईत दाखल झाले असून शिष्टाचाराप्रमाणे ते थेट क्वारन्टाईन झाले. क्वारन्टाईन कालावधीत त्यांचीही कोरोना चाचणी होईल आणि त्यानंतर त्यांना सरावाला उतरण्याची मुभा मिळू शकेल.
‘सध्या काही बाबींवर मार्ग काढावा लागत असला तरी येत्या काही दिवसात सर्व काही ठिकठाक होईल आणि आम्ही प्रत्यक्ष स्पर्धेत दर्जेदार खेळ साकारु’, असे चेन्नई प्रँचायझीतील एका सूत्राने नमूद केले.
बीसीसीआय कोरोना चाचणीसाठी 10 कोटी खर्च करणार
आयपीएल स्पर्धेसाठी युएईत असलेल्या प्रत्येक सदस्याची कोरोना चाचणी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 10 कोटी रुपयांची तजवीज केली आहे. यादरम्यान, एकूण 20 हजारच्या आसपास चाचणी होतील, असे त्यांनी नमूद केले. सहभागी आठ प्रँचायझींनी भारतात केलेल्या चाचण्यांचा खर्च स्वतः केला. पुढे, दि. 20 ऑगस्टपासून संघ युएईमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या चाचणीचा खर्च बीसीसीआयने उचलला आहे.

कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे अर्थातच प्रतिकूल स्थिती आहे. मात्र, बीसीसीआय ही स्पर्धा निर्धोकपणे पार पडण्यासाठी प्रयत्न असताना त्यांना सर्व घटकांनी सहकार्य करायला हवे. जैवसुरक्षितता पद्धत आपल्या सर्वांच्या हिताचीच असून त्याचा आपण आदर करायला हवा.
-आरसीबीचा कर्णधार विराट कोहली
रिचर्डसनऐवजी ऍडम झाम्पा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाने ऑस्ट्रेलियन गोलंदाज केन रिचर्डसनऐवजी लेगस्पिनर ऍडम झाम्पाची निवड केली. रिचर्डसन आपल्या पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत असून या पार्श्वभूमीवर तो मायदेशी परतला. झाम्पाने यापूर्वी पुणे सुपरजायंट संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. येथे आरसीबी संघात तो भारतीय फिरकीपटू यजुवेंद्र चहलचा सहकारी असू शकतो. रिचर्डसनचा इंग्लंडविरुद्ध होणाऱया मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघातही समावेश आहे. उभय संघातील ही मालिका दि. 4 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे.
सरावाचे सामने आयोजित करा : प्रँचायझींची मागणी

पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, दि. 19 पासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असली तरी खेळाडू बरेच महिने ‘मॅच प्रॅक्टिस’पासून दूरच असल्याने त्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी सरावाचे सामने आयोजित करावी, अशी मागणी बहुतांशी प्रँचायझींनी बीसीसीआयकडे केली आहे. तूर्तास, चेन्नई सुपरकिंग्स वगळता अन्य सर्व संघांनी प्रत्यक्ष मैदानावर जोरदार सरावाला यापूर्वीच सुरुवात केली आहे. या स्पर्धेचे प्रसारणकर्ते स्टार इंडियाने देखील सरावाचे सामने आयोजित करण्याच्या कल्पनेला हिरवा कंदील दर्शवला आहे.
हरभजनचा प्रवास पुन्हा लांबणीवर

चेन्नई सुपरकिंग्स संघातील अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने दुबईला रवाना होणे दुसऱयांदा टाळले असून यामुळे चेन्नईच्या गोटात त्याच्या उपलब्धतेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. हरभजन येणार नाही, तो माघार घेईल, अशी चर्चा सुरु आहे. चेन्नईच्या व्यवस्थापनाने मात्र यात काहीही हशील नसल्याचा दावा केला आहे. ‘हरभजन सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात येथे येणार होता. पण, अद्याप त्याने आपण येणार नाही, असे कळवलेले नाही. त्यामुळे, जी चर्चा होत आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही’, असा दावा चेन्नईतील एका सूत्राने केला. तीन वेळा आयपीएलचा जेता ठरलेला चेन्नईचा संघ यंदा फक्त 13 खेळाडूंसह काही अडचणींचा सामना करत आहे आणि त्यातही त्यांचे दोन खेळाडू सध्या कोरोनाबाधित आहेत.