प्रतिनिधी/ सातारा
ऑक्टोबर महिन्याच्या मध्याकडे जाताना सातारा जिल्हय़ाचा कोरोना संसर्गाचा विळखा सैल होताना दिसत माण, सातारा, फलटण तीन तालुक्यातील अल्प दोन अंकी वाढ सोडता इतर कराड, खटाव, खंडाळा, जावली, कोरेगाव, पाटण एक अंकी संख्येवर आलेले असून महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्त झाल्याचा दिलासा सोमवारी रात्रीच्या अहवालात लाभला आहे. सलग दुसऱया दिवशी बाधित वाढीचा आलेख 100 च्या खाली राहिला असून जिल्हय़ाची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु असल्याची स्थिती निर्माण झालीय.
दरम्यान, सोमवारी रात्री शासनाच्या कोव्हिड पोर्टलवरुन प्रशासनाकडून पाठवण्यात आलेल्या माहितीनुसार 94 जणांचा अहवाल कोरोना बाधित आला असून 2 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 6 मृत्यूंची नोंद उशिरा करण्यात आलेली आहे. मंगळवारी सायंकाळी 28 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
दोन पालक गमावलेले 17 बालके
सद्यस्थितीत सातारा जिह्यामध्ये कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या 17 बालकांची माहिती तसेच एक पालक गमावलेल्या 597 बालकांची अशा एकूण 614 बालकांची माहिती प्राप्त झाली आहे. कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 15 बालकांना व एक पालक गमावलेल्या एकूण 507 बालकांना अशा एकूण 522 बालकांना बाल कल्याण समिती, सातारा यांच्यामार्फत आदेश प्राप्त करुन बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
422 विधवा महिलांना मिळणार मदत
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीतील 2902 विधवा महिलापैकी एकूण कोरोनामुळे पती गमावलेल्या 422 महिलांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 15 अनाथ बालकांपैकी 4 बालकांना त्यांचे स्थावर मालमत्ता वारस नोंदी केलेल्या आहेत.
तपासण्या मंदावल्या, पॉझिव्हिटी 2 टक्केंवर
गेल्या चार पाच दिवसात तपासण्यांचा वेग मंदावला असून तो चार ते पाच हजारांवर आलेला आहे. मात्र, यामध्ये जिल्हय़ाचा पॉझिटिव्हीटी दर 2 टक्के एवढा खाली घसरला असून सर्वच तालुक्यात बाधित वाढीचा वेग मंदावला आहे. मात्र, अल्पवाढीतही सातारा, फलटण, माण तालुक्यात दोन अंकी वाढ जिल्हय़ाला सतावते आहेच. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्हय़ात सध्या फक्त 1 हजार 583 रुग्ण सक्रीय असल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात आहे.
94 जणांचा अहवाल बाधित
सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार आजचे व आजअखेर बाधित झालेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी आहे. माण 24 (17,839), सातारा 23 (51,628), फलटण 19 (37,198), खटाव 8 (25,735), कराड 3 (39,078), खंडाळा 3 (14,155), जावली 3 (10,002), वाई 3 (15,715), कोरेगाव 2 (21,882), पाटण 1 (10,128), महाबळेश्वर 0 (4,685), इतर 1 (2,145) असे एकूण 2,50,256 आजअखेर बाधित झालेल्याची संख्या आहे.
मंगळवारी 17 हजार जणांचे लसीकरण
जिल्हय़ात मंगळवारी देखील लसीकरणाची गती वाढलेली होती. त्यामुळे दिवसभरात 17 हजार 12 जणांचे लसीकरण करण्यात आले. यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांची एकूण संख्या 26 लाख 68 हजार 287 एवढी दिलासादायक झालेली असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या 18 लख 79 हजार 467 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 88 हजार 820 एवढी झाल्याची नोंद कोविन पोर्टलवर आहे.