प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्याचा सुपुत्र पोलाइट स्पोर्ट्स क्लब चा खेळाडू तरणजित धील्लो (शहाजी ) याची मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्यासाठी त्याला सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजय बजाज यांचे व पोलाइट स्पोर्ट क्लबचे उपाध्यक्ष राहुल आरवाडे, सेक्रेटरी युसूफ जमादार, खजिनदार चिकू कोठारी, कोच चेतन पडियार, गणेश कुकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
संजय बजाज साहेबांच्या प्रयत्नाने मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सांगली जिल्हात प्रथमच या खेळाडूस मान मिळाला आहे. सांगलीचे ज्येष्ठ क्रिकेटखेळाडू विठ्ठल जोशी यांच्यानंतर तब्बल 40 वर्षानंतर रणजी संघात निवड झालेला शहाजी हा पहिलाच खेळाडू आहे. महाराष्ट्र संघाचे नेतृत्व भारतीय संघाचा धडाकेबाज खेळाडू केदार जाधव हा करणार आहे. धिल्लो याने यापूर्वी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.