प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि देशाप्रती ओढ निर्माण व्हावी यासाठी सांगली जिल्ह्यात केंद्रीय सैनिकी स्कूलची स्थापना करणेबाबतचे निवेदन खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना दिले.
खासदार पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यातून देशसेवेसाठी अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे तरुणांना आर्मीमध्ये भरती होणेसाठी अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये शेकडोंच्या संख्येने तरूण देशसेवेसाठी आर्मीमध्ये भरती केले जातात. तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे भारतीय वायुसेना विभागातील पदांसाठीसुद्धा भरती प्रक्रीया राबविण्यात आली होती. यावेळीही शेकडो तरुणांना यामुळे देशसेवेची संधी मिळाली. जिल्ह्यातील तरुणांना विद्यार्थी दशेपासुनच जर सैनिकी भरतीचे प्रशिक्षण मिळाले तर त्यांना त्याचा भविष्यात लाभ होणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यात केंद्रीय सैनिकी स्कूलची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी राजनाथ सिंग यांचेकडे केली.