प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्हय़ात कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला. नवे 112 रूग्ण वाढले आहेत. 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन रूग्णांमध्ये सांगली शहरात 65, मिरज शहरात 24 आणि ग्रामीण भागात 23 रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यातील रोझावाडी आणि काळमवाडी येथील व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात बळीची एकूण संख्या आता 44 झाली आहे.
सांगली-मिरजेत कोरोनाचा कहर सुरूच
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी सांगली शहरात रॅपिड ऍण्टीजन टेस्ट मोठय़ाप्रमाणात घेण्यात आल्याने यामध्ये सांगली शहरात 65 रूग्ण आढळून आले. सर्वाधिक रूग्ण हे इंदिरानगरमध्ये आढळले आहेत. येथील 23 जण बाधित निघाले आहेत. त्यामुळे संपूर्ण इंदिरानगर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात येणार आहे. याठिकाणी आणखीन तपासणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. याच प्रकारची टेस्ट सांगली शहरातील पोलीस ठाण्यात करण्यात आली त्यामध्ये चार पोलीस पॉझिटिव्ह आले असून एक होमगार्डही पॉझिटिव्ह आला आहे. सांगलीत नेहरूनगर, सांगलीवाडी, महसूलभवन, विश्रामबाग, बेथेलहेमनगर, फौजदार गल्ली, कलानगर, अलिशान चौक, रतनशी नगर येथे प्रत्येकी एक रूग्ण तर म्हसोबा गल्ली येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत. मिरज शहरातील शास्त्री चौक, ख्वाजा वस्ती, जवाहर चौक, माधव पेठ, याठिकाणी रूग्ण आढळून आले आहेत. तसेच प्रभाग सहा मध्ये 20 रूग्ण आढळून आले आहेत. असे एकुण 24 रूग्ण वाढले आहेत.
कवठेमहांकाळ एकाच कुंटुंबांतील नऊ जण पॉझिटिव्ह
कवठेमहांकाळ शहरातील एका उपनगरातील एकाच कुंटुंबांतील नऊजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर कुची येथील दोघेजण, खरशिंग येथील चौघेजण आणि ढालगाव येथील एकजण असे कवठेमहांकाळ तालुक्यात एकूण 18 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील एकजण बाधित आहे. मिरज तालुक्यातील अंकली येथील एक कर्नाळ येथील दोघेजण, पलूस तालुक्यातील माळवाडी येथील दोघेजण, पलुस शहरातील एकजण आणि सावंतपूर येथील एकजण बाधित झाला आहे. तासगाव तालुक्यातील जरंडी येथील दोघेजण, वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे एक काळमवाडी येथील एक आणि कार्वे येथील एकजण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जत शहरात एकजण, आटपाडी तालुक्यतील विठ्ठळापूर येथील एक जण बाधित झाला आहे.
दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
वाळवा तालुक्यातील रोझावाडी येथील 41 वर्षीय माजी उपसरपंचांना कोरोना झाला होता. त्यांच्यावर मिरजेत उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. तर काळमवाडी येथील 57 वर्षीय व्यक्तीवरही मिरजेत उपचार सुरू होते उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बळीची संख्या आता 44 झाली आहे.
शुक्रवारी 31 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात शुक्रवारी मोठयाप्रमाणात रूग्ण वाढले असले तरीसुध्दा दिलासा देणारी बाब म्हणजे जिल्हय़ातील उपचार सुरू असणारे 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असणाऱया 18 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 1396
बरे झालेले 713
उपचारात 639
मयत 44
Related Posts
Add A Comment