कुपवाड / प्रतिनिधी
गजबजलेल्या सांगलीतील पटेल चौकात आलेल्या ‘त्या’ बिबट्याने बुधवारी सांगलीकरांना चांगलाच घाम फोड़ला होता. अडगळीच्या खोलीत लपून बसल्याने १४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास वन विभागाच्या पथकाने बिबटयाला नैसर्गिक अधिवासात सोडले.
दरम्यान, वन विभागामार्फ़त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करूनच नैसर्गिक अधिवासात सोडले असल्याची माहिती सांगली वनविभागाचे वनसंरक्षक प्रमोद धानके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बुधवारी सकाळी सांगलीतील नागरी वस्तीत पटेल चौकात बिबटया शिरल्याचे मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या नागरिकांनी पाहिले आणि धास्तीने नागरिकांचा थरकाप उडाला होता. नागरिकांची सुरक्षितता महत्वाची मानून याची दखल घेऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह मनपा, पोलिस व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने जाळी आणि पिंजरे लावले. तब्बल १४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. त्यानंतर त्या बिबट्याला कुपवाडमधील वनविभागात आणण्यात आले. या मोहिमेत सर्वजन गाफिल राहिलो असतो तर बिबटया रस्त्यावर आला असता. सांगलीकरांच्या सहकार्यामुळेच बिबट्याला पकडणे शक्य झाले असल्याचे सांगण्यात आले.
सांगली जिल्ह्यात चांदोली आणि सागरेश्वर ही दोन तर जिल्ह्याशेजारी राधानगरी व कोयना अभयारण्ये आहेत. या ठिकाणाहुन भरकटल्याने अथवा भक्ष्याच्या शोधासाठी बिबटया बाहेर पडत असल्याची शक्यता आहे. चांदोली लगतच्या शिराळा, मणदूर अथवा वाळवा तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्याच पद्धतिने हा बिबट्या बुधवारी पहाटेच्या सुमारास जंगलातून भरकटल्याने अथवा भक्ष्याच्या शोधासाठी सांगलीच्या नागरी वस्तीत घुसला असावा, असा अंदाज आहे. त्याचे अस्तित्व नेमके कुठले अथवा कुठून आला ? असा निश्चित अंदाज सांगता येत नसल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
Trending
- ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जबाबदारीपूर्वक काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर
- मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन
- ‘सेंट्रल हायस्कूल 1988 बॅच वर्गमित्र’कडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
- जेजुरीत ग्रामस्थांचे आंदोलन तीव्र
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जयसिंगपूरात निवासी वसतीगृह होणार; राजू शेट्टींची घोषणा
- आपल्याच आमदारांना सांभाळण्यासाठी सरकारकडून हवे तसे लाड ; आमदार शशिकांत शिंदे
- Sangli Breaking : सांगलीत कर्मचाऱ्यांना बांधून गोळीबार करत घातला दरोडा, रिलायन्स ज्वेलरी दुकानातील घटना
- उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करुन जेजुरीकरांना न्याय मिळवून देऊ, राज ठाकरेंचे आश्वासन