जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पाहणी
प्रतिनिधी / मिरज
सांगली जिल्ह्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मिरज शासकीय रुग्णालयात बेड वाढवणे आणि मुबलक ऑक्सिजन पुरवठा करणे गजरेचे आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चिंताजनक रुग्णांची परिस्थिती पाहता अतिदक्षता विभागात तातडीने 30 बेड वाढवा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी मिरज शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतला.
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. सध्या मिरज शासकीय रुग्णालयात 380 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 250 रुग्ण हे अतिदक्षता विभागात दाखल आहे. उर्वरित अन्य रुग्णही व्हेंटिलेटरवर आहेत. यापैकी काही रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची आवश्यकता आहे. मात्र, बेड शिल्लक नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि अतिदक्षता विभागात बेडची संख्या वाढवावी तसेच मुबलक ऑक्सिजन पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत होती. पालकमंतत्री जयंत पाटील आणि जिल्हा प्रशासनाच्या झालेल्या कोविड आढावा बैठकीतही बेड वाढविण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती.
मिरज शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा आणि अतिदक्षता विभागात बेडची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी मिरज शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतला. रुग्णालयातील चिंताजनक रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अतिदक्षता विभागात तातडीने 30 बेड वाढवा, असे आदेश त्यांनी दिले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे भांडारकर, रुग्णालयाचे आदीष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.