विटा रोटरी व मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम
प्रतिनिधी/विटा
विट्यातील सुळकाई डोंगर परिसर निसर्गरम्य आणि व्यायामासाठी लोकांचे आकर्षण ठरला आहे. टेकडीवरील सुळकाई देवीचे मंदिर आणि निसर्ग प्रेमींनी केलेली वृक्ष लागवड यामुळे अल्पावधीत त्याकडे गर्दी वाढत आहे. मात्र डोंगराच्या परिसरात वाढता प्लास्टिक कचरा प्रदूषण वाढवणारा ठरत होता. या पार्श्वभूमीवर विटा रोटरी आणि मॉर्निंग ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सुळकाई डोंगर व परिसर विटेकरांच्या सकाळी आणि सायंकाळी फिरण्याचे आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचे रमणीय ठिकाण आहे. गेल्या काही दिवसात सुळकाई परिसरात व्यायामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढती आहे. या डोंगरावर सुळकाई देवीचे अतिशय सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर पर्यटन स्थळ म्हणुन उदयास येत आहे.
परंतु गेल्या काही दिवसात या परिसरामध्ये येणारे पर्यटक आणि काही बेजबाबदार मद्यप्रेमीच्या रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या पार्ट्यांमुळे डोंगराच्या पायथ्याशी प्लास्टिक कॅरी बॅग्ज, दारुच्या आणि पाण्याच्या बाटल्यांचा खच साचु लागला होता. यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होऊ लागला होता. त्याकडे लक्ष वेधत विटा रोटरी आणि गुड मॉर्निंग ग्रुपने स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प केला होता.
त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी सकाळी रोटरी परिवार आणि मॉर्निंग ग्रुप सदस्यांनी सुळकाई परिसरात सकाळी ०६ ते ०८ या वेळेत स्वच्छता अभियान राबवीले. यावेळी तब्बल बारा मोठी पोती भरुन कचरा संकलन केला आहे. यापूर्वी देखील बऱ्याच निसर्ग प्रेमी संघटनांनी सुळकाई परिसरात वृक्षारोपण, स्वछता मोहीम राबवली आहे.
उपक्रमात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न
यापुढेही वेळोवेळी हा उपक्रम राबवून सुळकाई परिसर स्वच्छ व पर्यावरणपुरक ठेवण्याचा संकल्प विटा रोटरी परिवाराने केला आहे. कोविड च्या पार्श्वभुमीवर सर्व काळजी घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न राहील – सुधीर बाबर, अध्यक्ष विटा रोटरी.
Trending