१४ सप्टेंबरपर्यंत मिळणार मोफत भोजन, दोन महिन्यात दुप्पट केंद्रे
कोरोना आणि महापुरात केंद्रे शेकडोंचा आधार बनली
प्रतिनिधी / सांगली
राज्य शासनाने शिवभोजन थाळी मोफत देण्याची मुदत १४ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. सध्या जिल्ह्यातील ३२ केंद्रातून रोज ६ हजार थाळींचे मोफत वाटप करण्यात येत आहे. कोरोना आणि महापूर काळात शिवभोजन केंद्र शेकडो लोकांना आधार ठरले आहे.
सांगलीत २६ जानेवारी २०२० रोजी एकावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सांगली बसस्थानक, मार्केट यार्ड आणि सिव्हील हॉस्पिटल परिसरात या केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवसापासून गरजूंनी गर्दी केली. सुरूवातीला थाळीची किंमत दहा रूपये होती. दोन चपाती, भाजी, आमटी आणि भात अशा पदार्थांचा थाळीत समावेश आहे.
राज्य शासनाची लोकप्रिय योजना
राज्य शासनाची विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वकांक्षी योजना आहे. राज्यातील निराधार, बेघर यांची या थाळीमुळे जेवणाची सोय झाली आहे. शासनाची ही योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे शासनाचेही योजनेकडे विशेष लक्ष आहे.
कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात थाळीची किंमत पाच रूपये करण्यात आली. लॉकडाऊन काळात गरिबांची उपासमार रोखण्यासाठी 15 एप्रिलपासून थाळी मोफत दिली जात आहे. टप्प्याटप्प्याने मोफत वाटपाची मुदत वाढवण्यात आली आहे. महापूर काळात तर जिल्हÎात दुप्पट थाळींचे वाटप करण्यात आले. आता 32 केंद्रांच्या माध्यमातून दीडपटीने मोफत थाळी देण्यात येत आहेत.
मंजुरीचे अधिकार शासनाकडे
नवीन शिवभोजन केंद्र मंजुरीचे अधिकार राज्य शासनाकडे आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत नियमानुसार केंद्र ठिकाणाची पहाणी करुनच परवानगी देण्यात येते. पुरवठा निरीक्षकांमार्फत जेवणाच्या दर्जा आणि गुणवत्तेवर लक्ष देण्यात येत असल्याने गोरगरिबांना याचा चांगला लाभ होत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. वसुंधरा बारवे यांनी दिली.
केंद्र निहाय थाळींची संख्या पुढीलप्रमाणे
महापालिका क्षेत्रात 16 आणि ग्रामीण भागात 16 केंदे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये ओमरत्न आटपाडी 75, राधिका आटपाडी 75, बसस्टँण्ड आटपाडी 75, जत बस स्टँण्ड, 175, शिव हॉटेल कडेगाव 150, स्वामी समर्थ कवठेमहांकाळ 150, शिवसाई जनसेवा केंद्र विटा 150, हॉटेल विश्वेश्वर स्टेशन रोड 175, मिरज बस स्टॅण्ड कॅन्टीन 150, साई हॉटेल एमआयडीसी कुपवाड 75, श्री समर्थ भोजनालय गणेश मार्केट मिरज 100, मिरज सिव्हील 100, शिवगंगा हॉटेल पलूस 150, सांगली बसस्टॅण्ड 200, मार्केट यार्ड 200, सिव्हील हॉस्पीटल 200, विजयनगर 150, कुपवाड सोसायटी 100, वखार भाग 100, अवधूत भोजनालय बस स्टॅण्ड रोड 100, विष्णूअण्णा फळमार्केट 100, शिंदे मळा 100, क्रांती क्लिनीक समोर 100, शंभर फुटी रोड चेतना पेट्रोल पंपाजवळ 100, गुरूवार पेठ शिराळा 150, शिराळा नगरपंचायत 100, जुने तहासिल ऑफीस शिराळा 100, तासगाव मारूती मंदिरा पाठीमागे 150, हॉटेल पंगत वाळवा 150, हॉटेल बालाजी एक्झुक्युटीव्ह 150, हॉटेल श्री दत्तगुरु आष्टा, हॉटेल शिवन्या आष्टा 75, शिव भोजनालय वाळवा 100 अशी संख्या आहे. सध्या या केंद्रातून मंजूर संख्येच्या दीडपट वाटप करण्यात येत आहे.