लॉकडाऊनच्या काळात 9 टन भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकविला, 2 हेक्टर जमिनीत आता प्रथमच बासमती भाताची लागवड करणार
प्रसाद तिळवे / सांगे
सांगेतील नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील साळजिणी हा सह्याद्रीच्या डोंगर-कपारीत आणि गोव्याच्या एका टोकाला वसलेला लहानसा गाव आहे. थंड हवामान आणि निसर्गाने नटलेला, प्रदूषणापासून मुक्त असा हा गाव एकेकाळी खाण व्यवसायाने गजबजून गेला होता. पण सध्या कृषी क्षेत्रात तो पुढे आला आहे. येथील कष्टकरी समाजाने गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतीचे महत्त्व ओळखले असून शेती व्यवसायावर भर दिला आहे.
साळजिणी हा अगदी दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये तसेच नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रात वसलेला लहान गाव असून लोकसंख्या जेमतेम 150 आहे. सांगेपासून 45 किलोमीटर, तर नेत्रावळीपासून 18 किलोमीटर अंतरावर तो वसलेला आहे. कोविडच्या महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला मिळणे दुरापास्त झाल्याने साळजिणीवासियांनी 9 टन इतकी भाजी सेंद्रिय पद्धतीने पिकवून त्याचा पुरवठा केला. त्याची विक्री त्यांनी नेत्रावळी येथील फलोद्यान महामंडळाच्या खरेदी केंद्रावर केली.
यंदा बासमतीची लागवड करणार
या भागातील लोकांकडे अर्धा एकर इतकी लहान आकाराची जमीन भातशेती व भाजीपाला लागवडीखाली आहे. सांगेच्या विभागीय कृषी कार्यालयाने चार वर्षांपूर्वी श्री पद्धतीने भात लागवडीची पद्धत कार्यान्वित केली. साळजिणी येथे खरीप हंगामात भातशेती केली गेली नव्हती. पण यंदा प्रथमच कृषी खात्याच्या प्रयत्नातून 2 हेक्टर जमिनीत बासमती भाताची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती सांगेच्या विभागीय कृषी अधिकारी गौरी प्रभुदेसाई यांनी दिली. केवळ 90 दिवसाच्या कालावधीत बासमतीचे पीक घेता येते. याशिवाय रागी आणि कोंगोची बियाणे येथील काही शेतकऱयांना दिलेली असून सध्या ते नांगरणीच्या कामात गुंतले आहेत.
सामुदायिक शेतीचा प्रयोग

महत्त्वाची गोष्ट म्हणजे साळजिणी येथील शेतकरी सामुदायिक शेती करण्यासाठी एकत्र आले आहेत. या शेतकऱयांनी एक गट स्थापन केला असून शेतीसभोवताली 750 मीटर्स लांबीचे सौर कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भटकी जनावरे व जंगली श्वापदांचा त्रास होणार नाही. एकूण 20 कृषी कार्डधारकांना याचा फायदा होणार आहे. वास्तविक साळजिणी येथे सर्वच अनुसूचित जमातींतील लोकांचा भरणा आहे. येथे शेतीसाठी पाण्याची समस्या असून त्यावर मात करण्यासाठी सामुदायिक शेती योजनेच्या अंतर्गत पाणी साठवून ठेवण्यासाठी टाकी उभारण्याचे तसेच जलवाहिनी टाकण्याचे प्रयोजन आहे.
कृषी खात्याच्या अधिकाऱयांनी वारंवार साळजिणी येथे भेटी देऊन तेथील शेतकऱयांना मार्गदर्शन केलेले आहे. कृषी कार्ड करण्यासाठी शिबिरे घेतली असून नऊ जणांना कृषी कार्ड उपलब्ध करून दिले आहे. 2003 सालापूर्वी येथे मँगनिजच्या खाणी चालू होत्या. तेथे गावातील लोक कामाला जायचे. तर आता या भागातील लोकांनी शेती हाच पर्याय निवडलेला आहे. त्यात ते यशस्वी झाले आहेत. याच गावात यापूर्वी उत्तम प्रकारे हिरवी मिरची तसेच वांग्याचे पीक शेतकऱयांनी घेतल्याची उदाहरणे आहेत.
शेतकऱयांना 8 लाखांचे उत्पन्न
गेल्या तीन ते चार महिन्यांत साळजिणी येथील शेतकऱयांनी भाजीविक्री करून सुमारे 4 लाख तर काजूच्या बिया विकून आणखीन 4 लाख रुपयांचे उत्पन्न घेतल्याचे सांगेच्या विभागीय कृषी अधिकारी प्रभुदेसाई यांनी सांगितले. शेतीच्या विकासासाठी त्यांनी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. रब्बी हंगामात 10 टन भाताचे उत्पादन त्यांनी घेतले. येथील जमीन रासायनिक खतांनी प्रदूषित न होऊ देता जास्त प्रमाणात शेणखत, पालापाचोळा व अन्य सेंद्रिय खतांच्या वापराखाली आहे. गावातील महिलांनी पावसाळय़ापूर्वी कोकम तसेच अटंबची सोले तयार केली असून पुरूमेत केला आहे. गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही. त्यातच दळणवळणाची साधने अपुरी असून वीज कधी येईल व गायब होईल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीचा तेथील लोक सामना करत आहेत.
थंड हवामानामुळे काही भाज्यांचे पीक उत्तम
साळजिणी येथील थंड हवामान जमेस धरता टॉमेटो, वांगी, नवलकोल, कोबी यांचे पीक उत्तम प्रकारे येत असल्याचे शेतकरी सांगतात. गावातील बुजुर्ग अशोक वेळीप यांनी सांगितले की, पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे पिकविलेल्या मालावर माणसाचा कमी प्रमाणात व जास्त अधिकार निसर्गाचा असतो. निसर्गच आम्हाला भरभरून देतो. याच गावातील भिकू गावकर यांचा फलोत्पादन महामंडळाने यापूर्वी उत्कृष्ट भाजीपाला उत्पादक म्हणून सत्कार केलेला आहे. त्यांनी 2 हजार चौरस मीटर जागेत 20 क्विंटल भाजीचे उत्पादन घेतले होते. या गावातील काही लोकांना झाडपाल्याची औषधे माहीत असल्याने त्यांनी ती जतन करून ठेवली आहेत.
मधमाशीपालन, गांडूळ खताचे प्रशिक्षण
येथील शेतकऱयांच्या उत्कर्षासाठी सांगेचे कृषी कार्यालय प्रयत्नशील आहे. तसेच आत्मा या संस्थेतर्फे शेतकऱयांना प्रशिक्षण दिले जाते असे ‘आत्मा’चे गट तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहम घाटे यांनी सांगितले. मधमाशीपालन, गांडूळ खत इत्यादींचे प्रशिक्षण शेतकऱयांना देण्यात आल्याचे घाटे यांनी सांगितले. साळजिणी म्हटले की, उत्तमपैकी हिल स्टेशन असून येथे वेलची, गाजर उत्पादनास व मधनिर्मितीस भरपूर वाव आहे.