उद्योजिका राधा तिंबलो यांनी स्व. शशिकांत गावकर ट्रस्टला दिलेली मदत आमदार प्रसाद गावकर यांच्याकडून सुपूर्द
प्रतिनिधी / सांगे
कोरोनाच्या काळात सांगेमध्ये रुग्णवाहिकेची नितांत गरज असल्याने तिंबलो प्रा. लि. सतीश तिंबलो ग्रुप ऑफ कंपनीच्या अध्यक्षा राधा तिंबलो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मान्य केल्याप्रमाणे स्व. शशिकांत शिवा गावकर चॅरिटेबल ट्रस्टला दिलेली एक रुग्णवाहिका आणि दोन वॉटर कूलर सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी ट्रस्टतर्फे सांगे आरोग्य केंद्राच्या आरोग्यधिकारी डॉ. सीमा पै फोंडेकर यांच्याकडे कंपनी अधिकाऱयांच्या उपस्थितीत सुपूर्द केले. नगराध्यक्षा स्वेता तारी व आरोग्याधिकारी डॉ. फोंडेकर यांचा हस्ते फीत कापून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कंपनीचे संचालक एम. आर. हेगडे, जी. व्ही. काणेकर, संजय आल्बेर्टे, वरुण वायंगणकर, ऍड. संजय मळकर्णेकर, एम. के. मनप्पा, सत्यवान गावकर, उपनगराध्यक्ष कॅरोज क्रूज, नगरसेवक रुमाल्डो फर्नांडिस, मेशू डिकॉस्ता, संगमेश्वर नाईक, संतीक्षा गडकर, प्राची नाईक, इक्बाल सय्यद, ट्रस्टचे चेअरमन लवकुश मळीक, सचिव सिद्धेश मडकईकर, श्याम गावकर, भाटीचे सरपंच उदय नाईक, पंच संदेश गावकर, रमेश मळीक, कुशाली मळीक, मार्पुस पेरेरा, उपसरपंच दीपक नाईक, आरोग्य निरीक्षक वासुदेव नाईक, डॉ. कायसूवकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार गावकर म्हणाले की, खाण व्यवसाय बंद पडला असला, तरी कंपनीच्या अध्यक्षा राधा तिंबलो यांनी सांगे भागातील सामाजिक कार्य थांबविलेले नाही. कोविड महामारीच्या कठीण काळात सुद्धा जनतेच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका व दोन वॉटर कूलर भेट म्हणून दिले आहेत. याबद्दल कंपनीचे आभार मानावे तितके थोडे आहेत. 108 च्या धर्तीवर सांगेतील आरोग्य सेवा हाताळताना एकूण तीन ते चार रुग्णवाहिका सांगे भागात उपलब्ध केल्या जाणार असून सांगे आरोग्य केंद्र, भाटी पंचायत भाग, रिवण पंचायत भाग आणि नेत्रावळी भागात पुढील काही दिवसांत त्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. कोणत्याही भागातून कॉल येताच पंधरा मिनिटांत रुग्णवाहिका जनतेच्या दारात उभी करण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असून जनतेला विनामूल्य सेवा देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कंपनीचे संचालक ऍड. मळकर्णेकर म्हणाले की, कोविड काळात कोणत्याही प्रकारे अधिक त्रास होऊ नयेत म्हणून सांगेच्या जनतेसाठी राधा तिंबलो यांनी रुग्णवाहिका भेट देण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतला असून या रुग्णवाहिकेची देखभाल स्व. शशिकांत शिवा गावकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे केली जाणार आहे. रुग्णवाहिकेची सांगेला खरी गरज होती. ती तिंबलो कंपनीतर्फे पूर्ण केल्याबद्दल आमदार गावकर यांचे अभिनंदन करून ही रुग्णवाहिका सांगेवासियांसाठी 24 तास उपलब्ध असेल अशी अपेक्षा नगराध्यक्षा तारी यांनी व्यक्त केली. सुनील भंडारी यांनी सूत्रसंचालन केले.