माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या मध्यस्थीने दुकानदारांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट, दिलासा देण्याचे आश्वासन
प्रतिनिधी / सांगे
सांगे व्यापारी संघटनेने बुधवारी पुकारलेला बाजारपेठ बंद यशस्वी ठरला. बाजारातील सर्व दुकाने प्रत्येकाने स्वखुशीने बंद ठेऊन सरकारने दुकानदारांना पन्नास टक्के थकबाकी माफ करण्याचा प्रस्ताव न स्वीकारल्याबद्दल निषेध नोंदविला. सांगे बाजारात पालिकेची दुकाने असून या दुकानदारांची थकबाकी भरण्याचा विषय अजून सुटलेला नाही. थकबाकीदार असलेली सर्व दुकाने व अन्य खासगी मालकीची दुकाने देखील बंद होती. मासळी व भाजीविपेत्यांनीही आपले व्यवहार बंद ठेवले होते. फक्त औषधालये तेवढी चालू होती. दुकानदार नंतर सांगे नगरपालिका कार्यालयात एकत्र आले.
यापूर्वी नगरपालिका उपसंचालकांनी पालिका मुख्याधिकाऱयांना पत्र पाठवून सरकारने दुकानदारांची पन्नास टक्के थकबाकी माफ करण्याचा प्रस्ताव स्वीकारला नसल्याचे कळविले होते. त्यावर व्यापारी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करून या निर्णयाचा निषेध म्हणून सांगे बाजारपेठ बंद ठेवण्याचे ठरविले होते.
मुख्यमंत्र्यांकडे सकारात्मक चर्चा : देसाई
या दुकानदारांशी तसेच व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱयांशी माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी संपर्क साधून मध्यस्थी करून मडगाव येथे मुख्यमंत्र्यांसमवेत भेट घडवून आणली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून पालिका उपसंचालकांनी पाठविलेले पत्र मागे घेऊन संध्याकाळी सहापर्यंत दुकानदारांना दिलासा देणारे दुसरे पत्र पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले गेल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू देसाई यांनी सांगितले. गेल्या वेळेलाही माजी आमदार फळदेसाई यांनीच दुकानदारांच्या प्रश्नाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई केली होती.
बुधवारी दुकाने बंद राहिल्याने बाजारात लोकांची वर्दळ कमी होती. चहाची हॉटेल्स व खानावळीही बंद असल्याने शासकीय कर्मचाऱयांना अडचणीचे झाले. एकूणच बंद शंभर टक्के यशस्वी ठरला.