इंडियन बॉईज हिंडलगा उपजेते, आकाश कटांबळे मालिकावीर, विनायक कुदेमनी सामनावीर

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
विनायक कुदेमनीची भेदक गोलंदाजी, गजानन व आकाश कटांबळे यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे अयोध्या कडोली संघाने इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा 8 गडय़ांनी पराभव करून पहिला साईराज ग्रामीण चषक पटकाविला. आकाश कटांबळेला मालिकावीर तर विनायक कुदेमनीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात इंडियन बॉईज हिंडलगा संघाने 8 षटकात 3 बाद 102 धावा केल्या. सुशांत कोवाडकरने नाबाद 41, सुशांत कडोलकरने 35 धावा केल्या. जगदंबा हंगरगा संघातर्फे विजय व बलराम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्याला उत्तर देताना जगदंबा हंगरगा संघाने 8 षटकात 6 बाद 35 धावाच केल्या. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. हिंडलगातर्फे सुशांत कोवाडकर व प्रतिक बाळेकुंद्री यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱया उपांत्य सामन्यात अयोध्या कडोली संघाने 8 षटकात 9 बाद 57 धावा केल्या. आकाश कटांबळेने 14 तर गजाननने 12 धावा केल्या. श्रीगणेश कणबर्गी तर्फे किरणने 3 तर आश्विनने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना श्रीगणेश कणबर्गी संघाने 8 षटकात 6 गडी बाद 54 धावाच केल्या. त्यात सागरने नाबाद 18 तर आश्विनने 15 धावा केल्या. कडोलीतर्फे गजाननने 2 तर आकाशने 1 गडी बाद केला.
अंतिम सामन्यात इंडियन बॉईज हिंडलगा संघाने 10 षटकात 9 गडी बाद 60 धावा केल्या. त्यात राकेशने नाबाद 18 तर सुशांत कोवाडकरने 13 धावा केल्या. कडोलीतर्फे विनायक कुदेमनीने 17 धावात 15 तर सुशांत व गजानन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अयोध्या कडोलीने 6.2 षटकात 2 गडी बाद 63 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. त्यात गजाननने नाबद 21, अजय भोसलेने 18 तर आकाश कटांबळेने नाबाद 12 धावा केल्या. हिंडलगातर्फे पवनने 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे नारायण फगरे, महेश फगरे, गजानन फगरे, धीरज देसाई, प्रवीण पिळणकर, शितल वेसने, विजय धामणेकर, विशाल पेडणेकर, सारंग राघोचे, रमेश मैल्यापगोळ, अमित बेळेकर, बी. आर. नाईक, विलास बसरीकट्टी यांच्या हस्ते विजेत्या अयोध्या कडोली संघाला 51 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या इंडियन बॉईज हिंडलगा संघाला 25 हजार रूपये रोख व चषक देवून गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यातील सामनावीर विनायक कुदेमनी, उत्कृष्ट फलंदाज संतोष सुळगे पाटील, उत्कृष्ट गोलंदाज विनायक कुदेमनी, उत्कृष्ट संघ काळभैरवनाथ गौडवाड, उत्कृष्ट यष्टीरक्षक सुशांत कडोलकर, मालिकावीर आकाश कटांबळे यांना रोख रक्कम व चषक देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून लल्ला मादार, ईश्वर ईटगी तर स्कोअरर म्हणून कल्पेश संभोजी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन आरिफ बाळेकुंद्री व मोहन वाळवेकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साईराजच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.