40 वॉर्ड संघांचा सहभाग

प्रतिनिधी /बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लबतर्फे बेळगावातील होतकरू क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डेपो मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. टेनिसबॉलप्रमाणे लेदरबॉल स्पर्धेत भाग घेऊन तरूण होतकरू क्रिकेटपटूंना संधी मिळवून देण्याचे काम साईराज स्पोर्ट्सच्या माध्यमातून केले जात आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे प्रतिपादन उद्योजक भरत देशपांडे यांनी केले.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर साईराज चषक वॉर्डनिहाय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नारायण फगरे, पुरस्कर्ते महेश फगरे, रोहित फगरे, गजानन फगरे, ए. बी. शिंत्रे, शितल पाटील, चैतन्य कुलकर्णी, अमर सरदेसाई, लक्ष्मण जोगानी, राजेश लोहार, लक्ष्मी राणा राठोड, विजय पाटील, प्रशांत वांडकर, नितीन गोडसे, सारिका पाटील, मंगेश पवार आदी उपस्थित होते.
प्रारंभी ए. बी. शिंत्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. मैदानाचे पूजन शितल पाटील यांनी तर लक्ष्मण जोगानी यांनी श्रीफळ वाढविला. यष्टीचे पूजन नारायण फगरे यांनी केले तर विजय पाटील व चैतन्य कुलकर्णी यांनी श्रीफळ वाढविला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक चषकांचे व टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेत 40 वॉर्डांच्या संघांनी भाग घेतला असून, त्यांचे 4 गट करण्यात आले आहेत.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला 51 हजार रूपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 25 हजार रूपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक, झेल, इम्पॅक्ट खेळाडू, शिस्तबद्ध संघ व मालिकावीर आण्णि प्रत्येक सामन्यातील सामनावीर अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. आज बुधवारपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. दररोज चार सामने खेळविले जाणार असून, 10 षटकांचे सामने खेळविले जातील.