के. आर. शेट्टी टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने साई स्पोर्ट्स संघाचा 6 गडय़ांनी तर विश्रुत स्ट्रायकर्स संघाने बीसीसी मच्छे संघाचा पाच गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सुजय सातेरी साईराज, सुदीप सातेरी विश्रुत स्ट्रायकर्स यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साई स्पोर्ट्स संघाने 20 षटकात 7 बाद 150 धावा केल्या. गोविंद गावडेने 4 षटकार 3 चौकारासह 25 चेंडूत 42, यश कळसण्णावरने 33, सुशांत कोवाडकरने 4 षटकार 1 चौकारासह 17 चेंडूत 36 तर रोहित पोरवालने 10 धावा केल्या. साईराजतर्फे कृष्णा बागडीने 27 धावात 3 तर दीपक राक्षे, नरेंद्र मांगुरे, ओंकार वेर्णेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज वॉरियर्स संघाने 19.2 षटकात 4 बाद 151 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. सुजय सातेरीने 2 षटकार 7 चौकारासह 46 चेंडूत 60, ओंकार वेर्णेकरने 2 षटकार 3 चौकारासह 44, अभिषेक देसाईने 1 षटकार 1 चौकारासह 15 तर सुधन्वा कुलकर्णीने 2 चौकारासह 14 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे पार्थ पाटीलने 16 धावात 2 तर राज दंगण्णावरने 42 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात बीसीसी मच्छे संघाने 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या. वेंकटेश शिराळकरने 4 चौकारासह 37, मनोज पाटीलने 2 षटकार 3 चौकारासह 33, विशाल गौरगोंडाने 3 षटकार 1 चौकारासह 30, शिवप्रकाश हिरेमठने 3 चौकारासह 27 धावा केल्या. विश्रुततर्फे विनित आडुरकर, आकाश कटांबळे, विजय पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विश्रुत स्ट्रायकर्सने 18.4 षटकात 5 गडी बाद 153 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. सुदीप सातेरीने 3 चौकारासह 51, मदन बेळगावकरने 1 षटकार 2 चौकारासह 25, रवी उकळीने 4 चौकारासह 20 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे अमर घाळीने 28 धावात 2 तर प्रवीण कराडेने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे जिरोम आंद्रादे, चंद्रकांत भट्ट, विवेक पाटील, प्रमोद जपे यांच्या हस्ते सामनावीर सुजय सातेरी, इम्पॅक्ट खेळाडू ओंकार वेर्णेकर, सर्वाधिक षटकार गोविंदा गावडे, उत्कृष्ट झेल सुधन्वा कुलकर्णी तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे ईब्राहीम मनगावकर, आसिफ मुल्ला, शंकरराव पावशे, हुरकान मुल्ला यांच्या हस्ते सामनावीर सुदीप सातेरी, इम्पॅक्ट खेळाडू मनोज पाटील, सर्वाधिक षटकार विशाल गौरगोंडा, उत्कृष्ट झेल विजय पाटील यांना चषक देवून गौरविण्यात आले.
शनिवारचे सामने-के. आर. शेट्टी किंग्स वि. अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स सकाळी 9.30 वा., साईराज वॉरियर्स वि. झेवर गॅलरी डायमंड, दु. 1.30.