प्रतिनिधी / सातारा :
अन्य शहरातील पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा फरक रोखीने देण्यात आला. सातारा पालिकेनेही तो द्यावा, या मागणीसाठी सातारा पालिका कामगार युनियनने काम बंद व धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आदेश मिळताच पालिकेचे कर्मचारी सोमवारी सकाळी पालिकेकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे पालिकेची दोन्ही शटर डाऊन आहेत.
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी प्रत्यक्ष येऊन युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. परंतु चर्चेअंती काहीच साध्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढवण्याकरता लवकरच युनियनचे अध्यक्ष ऍड.डी.व्ही.पाटील यांच्यासमवेत बैठक होणार असल्याची माहिती श्रीरंग घाडगे यांनी दिली.
सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा, त्याचा हप्ता रोखीने देण्यात यावा, या मागणीसाठी अनेकदा निवेदने देवूनही कार्यवाही होत नसल्याने सातारा मुन्सीपल कामगार युनियनने दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारी सकाळपासून पालिकेचे कर्मचारी पालिकेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे पालिकेचे दोन्हीही शटर डाऊनच होते. कोणी पदाधिकारीही बारा वाजेपर्यंत फिरकले नव्हते. या आंदोलनाची माहिती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना मिळताच ते पालिकेत आले. त्यांनी युनियनच्या शिष्टमंडळांना बोलवून घेतले. त्यांच्या केबीनमध्ये चर्चा झाली. शिष्टमंडळातील युनियनचे श्रीरंग घाडगे यांनी प्रखरपणे बाजू मांडले.
सातारा पालिकेतील कर्मचाऱ्यांना का सातव्या वेतन आयोगाचा फरक दिला जात नाही. इतर पालिकांनी दिला आहे. हा अन्याय आहे. तो दिला गेला पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर मुख्याधिकारी बापट यांनी तुम्ही मला पुरावे द्या, मी इतर पालिकेप्रमाणे जमा करतो, असे सांगताच घाडगे यांनी दोन दिवसांत त्या पालिकांनी कसे दिले आहे. त्यांची कागदपत्रे देतो तोपर्यंत काम बंद राहिल, असे सांगुन बैठक संपली. दरम्यान, या मागणीसाठी सातारा म्युनसिपल कामगार युनियनची बैठक अध्यक्ष ऍड. डी.व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती घाडगे यांनी दिली.