शासनाच्या भूमिकेबाबत गोंधळ : सातारकरांचा बेशिस्तपणा सुरु
चंद्रकांत देवरुखकर / सातारा
मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाला तेव्हा देशात कोरोना बाधितांची संख्या अल्पच होती. तर सातारा जिल्हय़ात फारसा गाजावाजाही नव्हता. 22 मार्चचा कडक कर्फ्यु पाळल्यानंतर लॉकडाऊन खऱया अर्थाने सुरु झाला. दोनच दिवसात साताऱयात दोन कोरोनाबाधित समोर आले. मात्र, सातारकरांना त्याचे काहीही पडले नव्हते. शेवटी पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागली अन मग सातारकर घरात बसू लागले होते. त्यावेळी जिल्हय़ात बाधितांची संख्या अगदी नगण्य होती तरीही दोन महिने सातारकरांसह जिल्हय़ाने कडक लॉकडाऊन पाळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आजमितीस दोन महिन्यानंतर जिल्हय़ात बाधितांची संख्या 556 असून दररोज वाढणारी बाधितांची संख्या अंगावर काटा असताना शहरात होणारी गर्दी पाहता सातारकरांना कोरोनाचे भय राहिले नाही अशी स्थिती आहे.

मार्च, एप्रिलमध्ये सातारा जिल्हय़ात अनेक तालुके ग्रीन झोनमध्ये होते तर सातारा शहर देखील कोरोनामुक्त होते. कराडमध्ये वाढणारी कोरोना बाधितांची संख्या जिल्हय़ाची चिंता वाढवत होती. तर कराड हॉटस्पॉट झाले असताना साताऱयात कोरोनाने शिरकाव केला आणि दोन आरोग्य कर्मचारी बाधित म्हणून समोर आल्या. तर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मात्र समाजाशी फारसा संपर्क नसलेल्या सातारा जिल्हा कारागृहात पुण्याहून आणलेले तब्बल 10 कैदी कोरोना बाधित झाले होते. त्यातच प्रतापगंज पेठ, रविवार पेठ, गेंडामाळ परिसरात बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी सर्वजण कोरोनामुक्त होवून घरी गेल्याने सातारा शहर कोरोनामुक्त झाले होते.
मात्र मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा समर्थ मंदिर परिसरातील बालाजीनगर अपार्टमेंटमध्ये एक बाधित समोर आला. संबंधित व्यक्ती त्यांच्या बेलावडे, ता. जावली येथे सासऱयाच्या अंत्यविधीस गेली होती. त्यांच्या सासऱयाचा मृत्यपश्चात अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मग त्यांना हायरिस्क कॉन्टॅक्टमुळे रायगाव, ता. जावली येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने समर्थ मंदिर परिसरात खळबळ उडाली. तिथे परिसरात नागरिकांकडून अनेक तर्कविर्तक व्यक्त केले जात आहेत. मात्र पालिकेने तिथे खबरदारीची उपाय योजना सुरु केली आहे.
आता एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना त्या बहुतांशी हे मुंबई व पुण्याहून साताऱयात आपल्या गावी आलेले नागरिक आहेत. पुणे व मुंबईकर फक्त जिल्हय़ातील ग्रामीण भागच नव्हे तर जिल्हय़ातील सर्व शहरात देखील विखुरलेले आहेत. यापैकी अनेकजण होमक्वारंटाईन आहेत तर काहीजणांना इन्स्टिटय़ुशन क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. रात्री उशिरा येणारे अहवाल जिल्हय़ातील सर्वांच्या मनात धडकी भरवत असले तरी लॉकडॉऊन शिथील झाल्याने वाढणारी गर्दी मात्र कमी होत नसल्याने लोकांच्या मनातील कोरोनाचे गांभीर्य कमी झालेय की काय असा सवाल निर्माण होत आहे.
शासनाकडून हे उलटे चक्र का ?
वास्तविक आता जिल्हय़ात कोरोना बाधितांची वाढू लागलेली संख्या अंगावर काटा आणत असताना सातारा शहरासह जिल्हय़ात मायक्रो कंटेन्मेट झोन वगळता होत असलेली गर्दी भीतीदायक आहे. मुंबईचा प्रसाद राज्यभर वाटला गेल्याने थोडा थोडा प्रत्येक जिल्हय़ाला मिळाला आहे. यामध्ये जेव्हा जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या अगदी नगण्य होती तेव्हा पोलिसांनी अनेकांचे पार्श्वभाग सुजवून लॉकडाऊन यशस्वी करण्याचा चंग बांधला होता आता तर बाधितांची संख्या साडेपाचशेकडे गेली असताना मात्र जिल्हा काही बाबी वगळता पुन्हा सुरु झाल्याने लोकांच्या मनातही गोंधळ व संमिश्र भीती आहे. शासनाचे हे चक्र उलटे का फिरतेय असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
सातारकरांची बेशिस्त सुरुच
शासनाने लॉकडाऊन शिथील केलाय कोरोना संपलेला नाही. त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणेच गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्स पाळणे या गोष्टी संपलेल्या नाहीत. मास्क नसल्यास दंड, थुंकल्यास दंड शासन करु लागलेय तर दुचाकीवर फक्त चालकच तर चारचाकीत चालक व दोन व्यक्ती असे रुल असताना ते फालो केले जात नाहीत. सायंकाळी 6 नंतर रस्त्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र ऐकतील ते सातारकर कसले ? काही सातारकरांकडून बेशिस्त सुरुच असून आता कोरोनाची पुढील स्थिती काय असेल हा प्रश्न तसा सर्वांच्या मनात आहेच.