प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या आई शाबाई शेलार (वय 65) यांच्या डोक्यात रॉड मारुन अज्ञाताने खून केल्याची शनिवारी पहाटे रामनगर वारजे येथे घटना घडली. या घटनेने वारजे माळवाडीसह परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पहाटेच पोहचले असून आरोपींचा शोध सुरु झाला आहे.
शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या आईच्या डोक्यात रॉड मारुन खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पहाटे वारजे माळवाडी येथे घडला आहे. वारजे माळवाडी येथील रामनगर भाजी मंडईजवळ ही पहाटे घटना घडली. शाबाई शेलार यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. भाजी मंडईजवळच त्यांचे दुकान असून त्या तेथेच रहात होत्या. भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एकाने हा प्रकार पाहून पहाटे साडेपाच वाजता वारजे पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसात लॉकडाऊनच्या काळातच खुनांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 4 दिवसांत संचारबंदी असतानाही पुणे परिसरात खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत.