प्रतिनिधी / नागठाणे
सातारा तालुक्यातील वारणानगर लांडेवाडी येथील एकाच कुटुंबातील पाचही कोरोना बाधितांचा अहवाल अखेर निगेटिव्ह आला. नुकतेच या सर्वाना घरी सोडण्यात आले असून त्यांना काही दिवसांसाठी गावातच कोरंटाईन करण्यात आले आहे. या घटनेने नागठाणे परिसर पुन्हा सेफ झोन झाला असून या परिसरातील ग्रामस्थानी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना रोगाने जोर पकडला होता. त्यातून सातारा जिल्हाही सुटला नाही. जिल्ह्यात एकीकडे बाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे नागठाणे परिसरातील गावांमधून कडक लॉकडाऊन पाळल्याने या परिसरातील गावात कोरोनाचा शिरकाव झाला न्हवता. मात्र १७ मे रोजी ठाण्याहुन या भागातील वारणानगर लांडेवाडी येथे आलेले एकाच कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने गावसह परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. सुदैवाने गावाने त्यांना शाळेतच क्वारंटाईन केल्याने संसर्ग वाढला नाही.
या सर्व बाधितांवर सातारा येथे उपचार सूरु होते. उपचारादरम्यान टप्प्याटप्प्याने या कुटुंबातील सगळ्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सगळ्यांचे अहवाल अखेर निगेटिव्ह आले. नुकतेच या संपूर्ण कुटुंबियांना घरी वारणानगर लांडेवाडी येथे सोडण्यात आले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवसांसाठी त्यांना घरातच क्वारंटाईन रहावे लागणार आहे. नागठाणे परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आरोग्य विभागासह महसूल विभाग तसेच बोरगाव पोलिसांनी विशेष परिश्रम घेत संपूर्ण गावांमधून कडक लॉकडाऊन पाळले होते. आता हे संपूर्ण कुटुंबच कोरोनामुक्त झाल्याने हा परिसर पुन्हा सेफ झोनमध्ये आला आहे.