प्रथमेश पवार युपीसीत देशात तिसरा तर महाराष्ट्रात पहिला
प्रतिनिधी / सातारा
आरफळ (ता. सातारा) संत ज्ञानेश्वर माउलींच्या पायीवारीचे जनक संत हैबतबाबा यांच्या पावन भूमीत नेहमीच ज्ञानाचा जागर होताना दिसत आहे. अशाच छोटय़ाशा आरफळ गावच्या प्रथमेश उमेश पवार-पाटील यांनी गावचे नाव देशाच्या पटलावर उज्ज्वल करून सन 2019 च्या झालेल्या युपीएसी परीक्षेत भारतात तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.
सातारा खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन, आरफळ ग्रामपंचायतचे पहिले सरपंच कै. प्रल्हाद रामचंद्र पवार-पाटील यांचे प्रथमेश हे नातू आहेत. प्रथमेश यांचे शिक्षण निर्मल कॉन्व्हेंट, सातारा येथे पहिली ते दहावीपर्यंत झाले. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, सातारा येथे एक्स्टर्नल अकरावी व बारावीचे शिक्षण घेत, त्याच दरम्यान सातारा येथील चाफेकर क्लासेस येथे दोन वर्ष पूर्णवेळ अभ्यास करून पुढील शिक्षणासाठी पुण्यात जावून वाडिया कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर डिस्कशन पदवी घेतली. सलग दोन वर्ष पुण्यातील युनिक ऍकॅडमीत पूर्णवेळ अभ्यास करून घवघवीत यश मिळवले. या यशात आई सुरेखा, वडील व चुलत्यांचा मोठा वाटा असल्याचे प्रथमेश सांगतात.
भागवत सरांचा कानमंत्र हेच यशाचे गमक-प्रथमेश पवार
कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असताना मोठय़ा संकटांना सामोरे जावे लागत होते, अशा परिस्थितीत चुलत्यांना आलेले अपंगत्व आणि वडिलांवर पडलेली संपूर्ण घराची जबाबदारी, त्यात आमच्या भावंडांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च आणि दुष्काळ अशा परिस्थितीचे चटके सहन करावे लागत होते. आजोबांपासून सुरु असलेला पारंपरिक शेती व्यवसाय, त्यात शेतमालाचे पडलेले बाजार भाव याचा मेळ घालता-घालता मेटाकुटीला वडील येत होते, अशा कठीण परिस्थितीतही मला यश साध्य करता आले, ही माझ्या कुटुंबीयांची देणं आहे. 2016 रोजी इंजिनिअरींग पास होऊन देखील युपीएससीच्या सिव्हील सर्विसची दोन वर्ष तयारी केली. मात्र, त्यात यश न मिळाल्यामुळे मी जिद्द सोडली नाही. त्याच दरम्यान युनिक ऍकॅडमीच्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि तेलंगणात पोलीस कमिशनर पदावर असणारे महेश भागवत यांनी वेळोवेळी दिलेला कानमंत्र हेच माझ्या यशाचे गमक असल्याचेही प्रथमेश सांगतात.
प्रथमेशवर शुभेच्छांचा वर्षाव
प्रथमेश यांच्या निवडीबद्दल आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश नारायण पवार-पाटील, आरफळचे सरपंच मेघा माने, उपसरपंच सुनील पवार, माजी उपसरपंच वैभव पवार, अश्विन पवार, उमेश पवार, राजेंद्र पवार यांनीही अभिनंदन केले आहे.