ठेकेदारांना नमस्कार तर सर्वसामान्यांना मिळतेय अपमानास्पद वागणूक
प्रतिनिधी / उंब्रज :
उंब्रज ता. कराड येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडून वीज बिलासंदर्भात तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना उद्धटपणाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे उंब्रजसह परिसरातील नागरीकांची या अधिकाऱ्याविषयी तीव्र नाराजी असून, या अधिकार्याची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
एकीकडे कोरोना काळातील वीज बिलांमध्ये नागरिकांना सवलत मिळाली नाही. त्यामुळे ग्राहक संतप्त आहेत. त्यातच अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तरे न देता अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्यामुळे या कार्यालयातील कामकाजाविषयी नागरिकांचा रोष वाढला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष घालावे अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. याबाबत अधिक माहिती अशी की, विद्युत वितरण कंपणीचे उंब्रज येथील कार्यालय कामातील दिरंगाई, वीज दुरुस्ती टाळाटाळ, ग्राहकांशी उध्दट वर्तणूक, संबंधित ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध ठेवून त्यांना सन्मानाची वागणूक व सर्वसामान्य ग्राहकांस अपमानास्पद वागणूक अशा अनेक कारणांनी चर्चेत आहे.
त्यातच मार्च २०२० मध्ये सर्वत्र कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले. त्यामुळे बहुतांश लोकांचे व्यवसाय, नोकरी व उद्योगधंदे सहा ते आठ महिने पूर्णपणे बंद होते. या काळात नागरिकांनी विजेचा केलेला वापर व त्याचे आलेले बील वारेमाप आहे. किमान लॉकडाऊनच्या काळातील बीलांमध्ये सवलत मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र विद्युत कंपनीच्या धोरणाने सर्वांचाच भ्रमनिरास झाला आहे.