औंध / वार्ताहर :
माण-खटाव तालुक्यातील शेती पाण्यासाठी वरदान ठरलेल्या उरमोडी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी हरणाई उद्योग समुहाचे संस्थापक काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेल्या पाणी प्रश्नाला गती मिळणार आहे.
खटाव -माणचा शेती पाणीप्रश्न कायमच उरमोडी योजनेभोवती फिरत राहिला आहे. राजकारणाच्या चर्चेचा विषय असतो. गेली अनेक वर्षे हा विषय खटाव-माणच्या लोकांच्या जिव्हाळ्याचा होऊन बसला आहे. राज्यातील महाविकासआघाडी शासनाने प्रलंबित पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यामध्ये जे अपुरे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी तसेच काम पूर्ण झाले अशा ठिकाणी पाणी वाटप करण्यासाठी शासनाकडून एक समिती स्थापन केली आहे. यामध्ये 18 मार्च 2016 व 26 डिसेंबर 2019 मधील तरतुदीनुसार उरमोडी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी देशमुख यांची जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवड करण्यात आली आहे.
कायम दुष्काळी असलेल्या माण-खटावच्या ओसाड धरणीला हिरवा शालू नेसवण्यासाठी देशमुख यांनी पाणी प्रश्नासाठी पाठपुरावा केला आहे. आंदोलने केली आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना रखडलेल्या उरमोडी प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे उरमोडी प्रकल्प पूर्ण होऊन पाणी माण खटाव मध्ये आले आहे. या पूर्वीच्या सदस्यांच्या काळात पाण्याचे वाटप व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होऊ लागल्याने लक्षात घेऊन सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने कालवा समितीच्या सदस्यपदी देशमुख यांची निवड केली.
माण-खतावचा पाणी प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध
उरमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून खटाव, माण तालुक्यात पाणी गेल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे .तसेच कृष्णा खोरे जिहे- कटापूर व तारळी प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात खटाव-माणचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यास आम्ही बांधील असून या रखडलेल्या प्रकल्पाचे कामे ही लवकरच पूर्ण होतील. यामुळे येथील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होईल.