वाई / प्रतिनिधी :
ओझर्डे, तालुका वाई येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय 38) यांना सिक्कीम येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. तांगडे यांच्या जाण्याने ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे.
तांगडे हे सिग्नल डिपार्टमेंटमध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. सिक्कीममधील कॉलिंग पाँग येथून 10 किलोमीटर दूर एका बर्फाच्या टेकडीवर कर्तव्यावर असताना दि. 8 रोजी बर्फाच्या डोंगराळ भागाला वादळी वारा आणि पावसाने रात्री 3 वाजण्याच्या सुमारास झोडपून काढले. त्यात त्यांचे तंबू उडून गेले. रात्रभर तांगडे आणि त्यांचे दोन साथीदार थंडीत कुडकुडले. त्यातच तांगडे हे चक्कर येऊन तेथील बर्फावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कॉलींग पाँग येथील बॅरेकपुर येथील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ते कोमात होते. आज सकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव सिक्कीमवरुन विमानाने पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.