भोजलिंग रिंगावण यात्रेनिमित्त ग्रामस्थांचे आयोजन
औंध / प्रतिनिधी
श्रीभोजलिंग रिंगावण यात्रेनिमित्त जांभुळणी ता. माण येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता विनाप्रेक्षक निकाली कुस्त्याचे लाईव्ह कुस्ती मैदान रंगणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून अनेक कुस्ती मैदाने व स्पर्धा रद्द असल्यामुळे कुस्ती क्षेत्राचे खुप मोठे नुकसान झाले आहे. कुस्ती मैदाने पूर्ववत सुरू होत नाहीत तोपर्यंत सर्व मल्लांना खुराकसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कुस्तीला प्रोत्साहन मिळावे त्याचबरोबर अर्थार्जन व्हावे यासाठी जांभुळणी ग्रामस्थांनी शासनाच्या नियमाच्या अधीन राहून प्रेक्षक विरहित कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे.
मैदानात महारुद्र काळेल ( कुर्डुवाडी) विरुद्ध सागर मोहोळकर(खवसपूर), तानाजी विरकर ( मसाईवाडी) विरुद्ध प्रशांत शिंदे ( सांगली),अमोल नरळे (जांभुळणी ) विरुद्ध अक्षय सूर्यवंशी (शेडगेवाडी),भावेश सावंत (दिवड) विरुद्ध प्रदीप ठाकूर (सांगली),महादेव माने (म्हसवड) विरुद्ध सागर तामखडे (भिकवडी),
मनोज कदम (सांगली) विरुध्द खाशाबा मदने (बेनापूर),गणेश जाधव (देवापुर) विरुद्ध मारुती सूर्यवंशी (सांगली),ओंकार मदने (कुंडल) विरुद्ध तेजस हेळवी(बेनापूर),.सागर शिंदे (कुर्डुवाडी) विरुद्ध आप्पा यमगर (बेनापूर),निलेश राजगे* (पिंपरी) विरुद्धओंकार जाधव(शेडगेवाडी),सूरज विरकर (पुळकोटी) विरुद्ध संग्राम सूर्यवंशी (सांगली) आदी मल्लामध्ये अटीतटीचा मुकाबला होणार आहे.
याचबरोबर छोट्या गटातील थरारक लढतीचेही आयोजन करण्यात आले आहे. मैदान प्रेक्षक विरहित घेण्यात येत असून सर्व कुस्तीशौकिनांना कुस्तीमैदानाचे थेट प्रक्षेपण फेसबुक व युट्युब या सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या पाहता येणार आहे. मैदानाचे समालोचन परशुराम पवार (आटपाडी) करणार आहेत. तरी कुस्तीशौकिनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.