प्रतिनिधी / नागठाणे :
सातारा तालुक्यातील नागठाणे व परिसरातील गावात कोरोनाबाधितांचे आकडे चिंताजनाकरित्या वाढत असल्याने नागठाणे ग्रामपंचायत व येथील व्यापारीवर्गाकडून दहा दिवसांच्या जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत नागठाणे बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदला ग्रामस्थ व व्यापारी संघटना यानी उस्फुर्त पाठिंबा दिला आहे.
नागठाणे ही परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे परिसरातील ५० गावांचा येथे रोजचा संपर्क येतो. परिणामी कोरोनाचा प्रसार वेगाने झाला आहे. गावात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये नागठाणेसह परिसरातील गावांमधील अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर चालली होती. एवढे होऊनही काही लोक कोरोनाला गंभीरपणे घेताना दिसत नव्हते. या मुळे हा निर्णय घेण्यात आला.
या बंद काळात गावात मेडिकल दुकाने व हॉस्पिटल्स फक्त नियोजित वेळेत चालू राहतील. तसेच ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवेतील ग्राहकांना पार्सल माल देण्याची व्यापाऱ्यांना मुभा दिली आहे. बुधवार बंदचा पहिला दिवस होता. गावात पुर्णपणे शुकशुकाट जाणवत होता. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व नागठाणेकर एकवटले आहेत.