दोन्ही पायांनी अधू असलेली व्यक्ती करतेय झाडलोट
सातारा / प्रतिनिधी :
सातारा पंचायत समितीकडे केवळ एकच स्वच्छता कर्मचारी असून, तो पगारापूरताच हजेरी लावतो. त्यामुळे पंचायत समितीचा सर्वच परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलेला दिसून येतो. अधिकाऱ्यांच्या टेबलवर असलेल्या फाईलवरही धुळीचा खच आहे. पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांनी संबंधित विभागाकडे यासंदर्भात पत्रही दिले आहे. मात्र, त्याची अद्याप दखल कोणी घेतली नाही. एक दिव्यांग व्यक्ती दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या समोरची तेवढी कशीबशी स्वच्छता करताना दिसतात.
सातारा पंचायत समितीच्या आवारात स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले आहेत. झाडांचा पाला तेथेच साठून राहिला आहे. दररोज येणाऱ्या नागरिकांना ओंघळवाणे दृष्य दिसते आहे. स्वच्छता करणारा कर्मचारी नसल्याने ही ओरड आहे. तसेच पंचायत समितीतील विविध कार्यालयात अधिकाऱ्यांसमोरील असलेल्या फाईलींवर धुळ साठून राहिली आहे. एवढेच काय तर परिसरात असलेल्या शौचालयांची तीच तऱ्हा आहे. वरच्या मजल्यावर पिण्याचे पाणी नाही. तळमजल्यात आतील असलेले शौचालय तुटलेले आहे. एकुणच परिस्थिती बिकट बनली आहे. पंचायत समितीतल्या स्वच्छतेकरता सभापती सरिता इंदलकर यांनी नुकतेच जिल्हा परिषदेत संबंधित विभागाकडे पत्र दिले असून त्या पत्रात पंचायत समितीच्या आवारातील कचऱ्याचे निर्मूलन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्ती करतोय झाडलोटसातारा पंचायत समितीच्या आवारात दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र आहे. या केंद्रात सल्ला व मार्गदर्शन घेण्यासाठी साताऱ्यातील कामाठीपुरा येथील आलेली दिव्यांग व्यक्ती सामाजिक हेतूने कार्यालयाच्या परिसरात झाडलोट करते.