शहरात गोळा केला जातोय एकत्रच कचरा
प्रतिनिधी/ सातारा
शासनाकडून स्वच्छतेला प्राधान्य अलिकडे दिले जाते. त्याकरताच स्वच्छ सर्व्हेक्षण हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मात्र, या उपक्रमास सातारा पालिकेकडून सातत्याने पिछाडीवर नंबर आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. सातारा पालिकेचा सोनगाव कचरा डेपो, शहरातील दररोज एकत्रितपणे गोळा होणारा कचरा, नागरिकांच्या चुकीच्या सवयी, केंद्र व राज्याचे पाहणी पथक आले की तेवढय़ापुरती होणारी पळापळ यामुळेच सातारा पालिकेचे रँकिंग सातत्याने घसरत आहे.
आपला सातारा, सुंदर सातारा ही सकाळी सकाळी धुन सातारकरांच्या कानावर पडत असते. परंतु नेमका सातारा सुंदर आहे का?, असा प्रश्न ठिकठिकाणी पडलेल्या कचऱयाच्या ढिगांमुळे वांरवार सातारकरांना पडतो. त्यास काही अंशी सातारकरही जबाबदार आहेत. सातारच्या घंटागाडीत ओला आणि सुका असा वेगवेगळा कचरा काहीजण न टाकता जातायेता रस्त्याकडेला व ओढय़ात पिशवीतून कचरा टाकणारे अनेकजण आहेत. त्यामुळे साताऱयात काही ठिकाणी असे चित्र पहायला मिळते. स्वच्छ सर्व्हेक्षण ही स्पर्धा 2014 पासून सुरु झाली. त्या स्पर्धेत आजपर्यंत साताऱयाचा उतरता क्रमांक लागलेला आहे. रवींद्र झुटींग, अण्णा लेवे आणि यशोधन नारकर यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाने चमकदार कामगिरी होतानाचे अनेक दाखले आरोग्य विभागात पहाला मिळतील. त्यानंतर मात्र, आरोग्य विभागाचेच तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे जेवढा सकारत्मक दृष्टीकोन हवा आहे तेवढा मिळताना दिसत नाही. सातारा पालिकेच्यावतीने काही त्रुटी आहेत. त्यामुळे शहराचे मानांकन हे पाठीमागे पडत चालले आहे.
या आहेत त्रुटी
गोळा केलेला कचरा योग्य पद्धतीने टाकला जात नाही.
सोनगाव कचरा डेपोबाहेरच काही नागरिक कचरा टाकतात.
कचरा एकत्रपणे टाकणाऱयांवर कारवाईच केली जात नाही.
शहराची प्रवेशद्वारावर टाकण्यात येणाऱया कचऱयावर उपाययोजनाही शुन्यच दिसतात.