मेढा / प्रतिनिधी :
कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडाला असून, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या माध्यमातून मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सजिन निर्मिती प्लांट उभा राहणार आहे. या प्लांटसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच या प्लांटच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह सातारा जिह्यातही थैमान घातले आहे. दररोज दीड ते दोन हजारच्या पटीने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही आणि बेड मिळाला तर ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढाकार घेऊन मेढा येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी लेखी पत्रव्यवहार करून चर्चा केली. या प्लांटसाठी निधीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लागणारा संपूर्ण निधी शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदार फंडातून उपलब्ध करून दिल. त्यामुळे हा प्लांट उभा राहण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.
प्लांट निर्मितीसाठी मेढा ग्रामीण रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली असून या जागेची पाहणी सोमवारी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने आदी उपस्थित होते.