वार्ताहर/वाठार किरोली
वाठार किरोली ता. कोरेगाव येथील युवक विजय हणमंत गिरी हा सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे २६ जुलै रोजी उपचार घेत होता त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याला कसलाही त्रास होत नव्हता. त्याचा ३ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकांना फोन वरून सांगण्यात आले. ३९ वर्षांचा धडधाकट युवक ८ दिवस उपचार घेत असताना त्याचा अचानक मृत्यू झाला. विजयच्या मृत्यूबाबत आमचे मनात शंका असून हा मृत्यू सिव्हीलच्या व तेथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विजयचे मामा चंद्रकांत गिरी व कुटूंबियांनी केली आहे.
विजयच्या नातेवाईकांना ३ तारखेला समजल्यावर त्यांनी तेथे जाऊन मृतदेह बघितला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही इजा किंवा जखम दिसली नाही. त्यादिवशी त्यांना सांगण्यात आले की उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्रभर बॉडी दवाखान्यात ठेवली होती. कुटुंबीयांनी ४ ऑगस्टला बॉडी पुन्हा बघितली असता संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला हिता, तसेच कपाळावर पट्टी होती. याबद्दल सिव्हील प्रशासनास विचारले असता त्यांनी उडवाउडवीची व उर्मट पध्दतीने उत्तरे दिली. यावरून कायद्याचे उल्लंघन करून बॉडीचे पोस्टमार्टम करून अवयवांशी छेडछाड तर केली नाही ना अशी आमची शंका आहे. जर कोविड १९ चा पेशंट मृत झाला तर मृतदेह ताब्यात देत नाहीत मग इजा व जखमा कशाने झाल्या याची व त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी.