वार्ताहर / वाठार किरोली
वाठार किरोली ता. कोरेगाव येथील ८५ वर्षीय महिलेचा कोरोना प्रादुर्भावामुळे सातारा येथे मृत्यू झाला. वाठार येथील महिलेच्या मृत्यूने वाठार परिसर पुन्हा हादरला आहे. त्यांच्याच घरातील त्याच्या मुलाचा पंधरा दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अगोदरच कुटुंब दुःखात होते. आज्जीच्या मृत्यूनंतर ते आणखी हादरले. कुटुंबातील काही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पूर्ण कुटुंबावर सातारा येथे उपचार सुरू होते. त्यातील ४ जणांना कोरोना मुक्त केले होते.
आज सकाळी या महिलेचा मृत्यू झाला आहे.
वाठार किरोलीची साखळी तुटत आली असे वाटत असताना पुन्हा दोन रुग्ण सापडल्याने वाठार मध्ये घबराट पसरली आहे. वाठार येथील ५५ वर्षीय पुरुष आणि त्याची ५० वर्षीय पत्नी आपल्या मुलीकडे गेले होते. त्यांना सर्दी, ताप व खोकला येत असल्याने एका खाजगी दवाखान्यात दाखवण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ते दोघेही पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे पुन्हा वाठार किरोलीसह परिसर हादरला आहे. वाठार येथे आत्तापर्यंत एकूण ७९ रुग्ण सापडले असून त्यापैकी ७३ जणांना कोरोना मुक्त करण्यात आले आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ६ जणांवर उपचार सुरू आहेत . वाठार किरोलीतील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासन ,ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन समिती आटोकाट प्रयत्न करत आहे. प्रशासन, पोलीस विभाग यांचेही प्रयत्न सुरु आहेत. वाठार मधील ग्रामस्थांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे आणि प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे.