प्रतिनिधी / नागठाणे
सासपडे(ता.सातारा) येथील शेतकऱ्याला वीज कनेक्शन न देताच वीजबिल पाठवण्यात आल्याची घटना घडली आहे. महावितरणच्या नागठाणे(गणेशवाडी) सर्कलच्या या भोंगळ कारभारामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने मनसेच्या पदाधिकाऱयांकडे धाव घेतली असून याबाबत सदर शेतकऱ्याला तात्काळ वीज कनेक्शन द्यावे अन्यथा मनसे स्टाईल ‘खळ-खट्याक’ आंदोलन महावितरणच्या नागठाणे (गणेशवाडी) कार्यालयात करण्यात येईल असा इशारा सातारा तालुका अध्यक्ष अमित यादव यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सासपडे येथील सदाशिव नारायण पवार यांनी ८ जानेवारी २०१५ रोजी शेतीच्या नवीन वीज कानेक्शनसाठी रीतसर ६,७०० रुपये अनामत रक्कम महावितरणकडे भरली.त्याबाबत त्यांचा सर्व्हे ही झाला. तसेच त्यांना विद्युत मीटरही देण्यात आले. त्यानंतर त्यांना ३ डिसेंबर २०२० रोजी विद्युत बिलही आले.
मात्र प्रत्यक्षात त्यांचा सर्व्हे होऊनही त्याच्या शेतात आज अखेरपर्यंत महावितरणकडून रीतसर वीज कनेक्शन जोडण्यात आलेले नाही.यामुळे महावितरणकडून सदाशिव नारायण पवार यांच्यावर अन्याय करण्यात आला असून मनसे हे कदापिही खपवून घेणार नाही. नागठाणे (गणेशवाडी) सर्कलने १० दिवसात त्यांना रीतसर वीज कनेक्शन द्यावे अन्यथा कार्यालयात ‘खळ-खट्याक’ आंदोलन करण्यात येईल असे शेवटी म्हटले आहे.नागठाणे (गणेशवाडी) येथील कार्यालयाबरोबरच उपकार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण,सातारा ग्रामीण व बोरगाव पोलीस ठाण्याला निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या आहेत.