आ. शिवेंद्रराजेंच्या पत्रामुळे सर्व्हेअर नेमले, माजी नगरसेवक अविनाश कदम यांची माहिती
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहराची हद्दवाढ होऊन दोन वर्ष होत आली आहेत. मात्र, शहरातील अनेक सातारकरांनी भैरोबाचा पायथा, महादरे गाव, धुमाळ आळी, व्यकंटपूरा या परिसरात जागा घेतल्या आहेत. तेथे आपली घरे बांधली आहेत. आता नुकतीच रिंगरोडची चर्चा सुरु झाल्याने अनेकजण कोडय़ात पडले आहेत. बोगदा ते मोळाचा ओढा होणार रिंगरोड तर दुसरा रिंगरोड मराठा पॅलेसपासून सुरूवात होणार आहे. या रिंगरोडमुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. आमदार शिवेंद्रराजेंच्या पत्रामुळे पालिकेने सर्वेअर नेमला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून रस्त्यासाठी निधी आणण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक अविनाश कदम यांनी दिली आहे. मात्र, ज्यांनी जागा घेतल्या त्यांच्यामध्ये धास्ती वाढली आहे.

जुन्या सातारा शहरातून अनेकांना भैरोबाचा पायथा, समाधीचा माळ, महादरे, धुमाळ आळी या भागात स्वस्तात शेतीच्या जमिनी मिळाल्या. त्यात एनए प्लॉटिंग करुन आपली घरे काहींनी बांधली तर काहींनी अपार्टमेंट, कॉलन्या अलिकडच्या दहा ते पंधरा वर्षात उभ्या केल्याचे चित्र दिसते आहे. या परिसरात रस्ते नाहीत, कॉलन्यात जाण्या येण्यासाठी खाजगी विकसकांनी स्वतःच्या पैशातून केलेलेच रस्ते सध्या वापरले जात आहेत. दोन वर्षापूर्वी पालिकेच्या हद्दीत हा भाग आलेला आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपासून रिंगरोडची चर्चा सुरु झालेली आहे. रिंगरोड कसा कुठून जाणार हे मात्र अजूनही नक्की नाही. मात्र नकाशा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये 18 मीटर रुंदीचा रस्ता 2000 च्या विकास आराखडय़ात दाखवण्यात आल्याचे दिसते आहे. त्यानुसार तो रिंगरोड नेमका कसा आणि कुठून जातो याच्या मात्र जोरदार चर्चा पश्चिम भागात सुरु आहेत. यामुळे ज्यांनी जागा घेऊन बुकींग केल्या आहेत. घरे बांधली आहेत ते धास्तावले आहेत. काहींनी तर आपल्या घराचा काही भाग जात असल्याची भिती घेतली आहे.
आमदार शिवेंद्रराजेंच्या पत्रामुळे सर्व्हे सुरु
आमदार शिवेंद्रराजेंच्या पत्रामुळे पालिकेने सर्व्हेअर नेमला आहे. सर्व्हे करण्याचे काम सुरु आहे. त्यांनी विनंती केल्याप्रमाणे सर्व्हे करुन इस्टीमेट करुन भूमिसंपादनासाठी किती निधी लागणार. त्या निधीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून रस्ता मंजूर करुन त्यावर निधी आणण्यात येणार आहे. हा रस्ता महत्वाचा असून सध्या जे बोगद्यातून समर्थ मंदिर, राजवाडा या रोडवर वाहतूक कोंडीची समस्या होते. ती वाहतूक कोंडी होणार नाही. हा रस्ता बोगदा, पॉवर हाऊस, मोरे कॉलनी, धुमाळ आळी, शाहुपूरी, मोळाचा ओढा असा आहे, असे माजी नगरसेवक अविनाश कदम यांनी सांगितले.
जुना रस्ता नेमका कोणता?
पॉवर हॉऊस येथून जानकर कॉलनीच्या पाठीमागून शेतातून काही रस्ते महादरेच्या बाजूकडे तर काही रस्ते हे व्यंकटपुऱयाकडे, काही रस्ते हे महादरे तलाव्यासमोर असलेल्या एका हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पालिकेच्या जागेतून तर महादरे रस्त्याच्या मधूनच भैरोबाच्या पायथ्याकडे जात आहेत. त्यामध्ये हे रस्ते पाणंद रस्ते आहेत. नेमके हे डीपीवर आहेत काय?, हेच रस्ते पूर्वीचे रिंगरोड अशीही चर्चा सुरु आहे.
ज्यांनी बांधकामे केली त्यांनी कशी परवानगी दिली?
या परिसरात नेमका कुठून रिंगरोड होणार याचेच अजून नक्की नाही. मात्र, अनेकांनी त्यावेळी महादरे ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवाना घेत, जिल्हाधिकाऱयांकडून परवानगी काढून बांधकामे केली आहेत, असे सांगण्यात येते. त्यांच्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहेत. की आपली जागा रस्त्यात जाणार तर त्यावेळी प्रशासनाने कशी परवानगी आम्हाला दिली असा सूर सध्या उमटत असुन यास विरोध होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दोन रिंगरोडचा सर्व्हे करण्याचे काम सुरु
शहराच्या विकास आराखडय़ात दोन रिंगरोड आहेत. एक रिंगरोड मराठा पॅलेसपासून जातो तर दुसरा रिंगरोड हा बोगदा ते मोळाचा ओढा जातो. या दोन्ही रिंगरोडचे काम करण्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व्हे करत आहोत. त्याकरता इंजिनिअर नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून काम सुरु आहे.
अभिजित बापट, मुख्याधिकारी