सातारा / प्रतिनिधी :
कोरोना काळातील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांना राज्यशासनाने 1500 रुपयांची घोषित केलेली रक्कम तुटपुंजी असली तरी दिलासा देणारी आहे. म्हणूनच त्या रक्कमेत सातारा नगरपरिषदेच्या स्वनिधिमधून आणखी 1000 रुपये प्रतिफेरीवाला देण्याबाबत आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला आहे, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
फेरीवाल्यांप्रती पारदर्शी धोरण राबविणेत येणार आहे. कोरोनाच्या कठीण पार्श्वभुमीवर प्रसंगी सातारा विकास आघाडीच्या व्यक्तीगत स्तरावरुनदेखील शासन घोषणेप्रमाणे आर्थिक मदत दिली जाईल. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण यापूर्वीच झालेले असल्याने शासन घोषणेप्रमाणे आणि निर्देशाप्रमाणे रुपये 1500 आणि नगरपरिषदेचे रुपये 1000 अशी एकूण 2500 रुपये दिलासा रक्कम पात्र फेरीवाल्यांना लवकरच प्रदान केली जाईल. कोणतीही पात्र व्यक्ती आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही, असेच धोरण नगरपरिषदेच्या स्तरावर राबवले जाणार आहे. त्याबद्दल कोणीही संभ्रम करुन घेवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.