राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ एक तासाने वाढविली
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महानगरपालिकेच्या 58 वॉर्डांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली होती. मात्र विविध कारणास्तव या वेळेत एका तासाने वाढ करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी दि. 11 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यावेळी मतदानासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंतची वेळ देण्यात आली होती. मात्र बेळगाव महापालिका आणि रायबाग नगरपंचायतीच्या आणि सौंदत्ती नगरसभेच्या वॉर्ड क्र. 23 च्या मतदानाच्या वेळेत एक तासाने वाढ करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दि. 23 ऑगस्ट रोजी बजावला आहे. त्यामुळे मतदानाची वेळ सकाळी 7 पासून सायंकाळी 6 पर्यंत राहणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कळविले आहे.