मानसशास्त्राचा आवाका मोठा असला तरीही जगभरात त्याचा तुलनेत पाठपुरावा केला जातो असे नाही. विशेषकरून गरीब देशांमध्ये मानसशास्त्राला फारसे महत्त्व मिळताना दिसून येत नाही. अनेक क्षेत्रांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरत चाललेल्या मानसशास्त्राचा दैनंदिन जीवनात, कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये वापर करण्याबाबत भारत खूपच मागे आहे असेच म्हणावे लागेल. याप्रकरणी युरोपीय तसेच काही आशियाई देश योग्य दिशेने पावले उचलून याच्याशी संबंधित समस्यांवर त्वरेने उपाय शोधून त्या दृष्टीने अंमलबजावणी करत आहेत.
भारतासह जगभरात मनोविज्ञानाला (सायकॉलॉजी) हवे तितके महत्त्व देण्यात आलेले नाही ही बाब खरी आहे. कोरोना महामारीने लोकांच्या शारीरिक प्रकृतीवर प्रतिकूल प्रभाव पाडला आहे, तसेच यामुळे अनेक मानसिक दुष्परिणाम देखील दिसून येत आहेत. याचमुळे जगभरात मनोवैज्ञानिक तज्ञांची मागणी आता वाढत चालली आहे. जगभरात वेगाने वाढणाऱया मानसिक समस्यांना या महामारीने चव्हाटय़ावर आणले आहे. तसेच सध्याचे आधुनिक जीवन अशा स्थितीत पोहोचले आहे, जेथे अनिश्चितता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये मनोवैज्ञानिक तज्ञांची (सायकॉलॉजिकल एक्स्पर्ट्स) भूमिका जगात अत्यंत वाढताना दिसून येत आहे. मनोवैज्ञानिक जगातील अनेक क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करताना दिसून येत आहेत. याचे कारण या ट्रेंडमध्येच दिसून येत आहे. मनोवैज्ञानिकांकडून सहाय्य किंवा सल्ला घेत जगभरातील उत्पादकता किंवा सकारात्मकता वाढविण्यात येत आहे.

अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने वाढतेय मागणी
मनोविज्ञान तज्ञ आता सरकार, प्रसारमाध्यमे, राजकारण, कॉर्पोरेट जगत, कारखाने, चित्रपटांचे सेट्स, तांत्रिक स्टार्टअप यासारख्या अनेक ठिकाणी अत्यंत मोठय़ा भूमिकेत आहेत आणि ते देखील स्पष्टपणे दिसून येऊ लागले आहेत. अमेरिकेच्या सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या लेखात, अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थी, व्यावसायिक आणि ऑलिम्पिक ऍथलिटांसोबत काम केलेले मनोवैज्ञानिक आणि क्रीडा मनोचिकित्सक जस्टिन अँडरसन यांनी पारंपरिक ऍथलिटही मनोचिकित्सकाचा सल्ला घेऊ लागल्याचे सांगितले आहे.
मनोविज्ञानाची वाढतेय कक्षा
तणाव कमी करण्याचे महत्त्व जगातील अनेक उद्योगक्षेत्रांमध्ये ओळखले जात आहे. याचबरोबर कर्मचाऱयांची कार्यक्षमता वाढविण्यातही या तज्ञांची मदत घेण्यात येत आहे. आता मनोवैज्ञानिक प्रशिक्षण अनेक प्रकारच्या क्षमतांवर भर देते, ज्यांची उद्योगांमध्ये मागणी वाढत चालली आहे. याचबरोबर आकडेवारीच्या विश्लेषणातून बहुल विषयक कार्यकारी टीम निर्माण करण्याचे काम देखील याच्या कक्षेत येऊ लागले आहे. मानसशास्त्रापर्यंत केवळ वैद्यकीय मार्गाने पोहोचण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. आता अकॅडमिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देखील मोठय़ा माध्यमांमध्ये सामील आहे.
समता, विविधता, समावेश
ज्या क्षेत्रात मानसोपचारतज्ञांची सर्वात मोठी मागणी होतेय ते ‘समता, विविधता आणि समावेश’ म्हणजेच ‘इक्विटी, डायव्हर्सिटी अँड इनक्लूजन’ (ईडीआय) आहे. मागील 5-6 वर्षांमध्ये विविध संस्थांमध्ये ईडीआय भूमिकांमध्ये 71 टक्क्यांची वाढ झाली आहे. यात सर्वांमध्ये मनोवैज्ञानिक नसले तरीही मनोवैज्ञानिक पार्श्वभूमीयुक्त प्राविण्य अत्यंत मूल्यवान ठरले आहे.
कार्यालयीन वातावरण

फ्लोरिडाच्या एक औद्योगिक आणि संस्थागत मनोवैज्ञानिक डॉ. किजी पार्क्स यांनी यासंबंधी महत्त्वाचे विचार मांडले आहेत. कार्यालयीन वातावरणात विविध टीम्समध्ये कशाप्रकारे आंतरक्रिया केल्या जातात हे समजून घेणे आता अत्यंत आवश्यक ठरले आहे. ऑफिस पॉलिटिक्स आणि व्यक्तिमत्त्वांचे प्रभाव काय असतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरत आहे. आता संस्था देखील प्रक्रियांवर तुलनेत अधिक लक्ष देऊ लागल्या आहेत. ईडीआयला महत्त्व देण्यात आल्याने मनोवैज्ञानिकांची मागणी वाढली आहे, कारण या विषयावर प्राविण्यासह ते आणखीन अनेक पद्धतींद्वारे संस्था आणि संघटनांना मदत करू शकतात. यामुळे कर्मचाऱयांची कार्यपातळी मोठय़ा प्रमाणावर उंचावली जाऊ शकते.
सार्वजनिक जीवनातही….
अमेरिकेत मनोवैज्ञानिक सार्वजनिक जीवनातही नव्या भूमिका पार पाडत आहेत. बराक ओबामांपासून जो बिडेन प्रशासनात अनेक प्रकारच्या सल्लागार पदांवर मनोवैज्ञानिकांना नियुक्त करण्यात आले आहे. तर सिंथिया एन. टेलेस यासारख्या मनोवैज्ञानिकाला कोस्टारिकामध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अमेरिकेच्या संसदेतही मनोवैज्ञानिकांची संख्या वाढली आहे.
दिग्गज कंपन्या सरसावल्या
सध्या मनोवैज्ञानिक अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, यात मायक्रोसॉफ्ट, गूगल, फेसबुक यासारख्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्या मनोवैज्ञानिकांची भरती करत आहेत. तर नव्या स्टार्टअपमध्ये देखील मनोविज्ञानाची पार्श्वभूमी असलेले लोक अधिक दिसून येत आहेत. तंत्रज्ञान कंपन्या स्वतःच्या उत्पादनांची लोकप्रियता जाणून घेणे, त्यांना लोकप्रिय करणे आणि लोकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी मनोवैज्ञानिकांची भरती करत आहेत.
मनोरंजन क्षेत्र
याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातही मनोवैज्ञानिकांची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. प्रसारमाध्यमे, माहितीपट निर्माते इत्यादी स्वतःच्या वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम आणि प्रकल्पांमध्ये मनोवैज्ञानिकांची मदत घेत आहेत. मनोरंजनात पटकथा लेखनापासून कलाकारांच्या निवडीपर्यंत मनोविज्ञान पार्श्वभूमी उपयुक्त मानली जाते. निर्माते स्वतःच्या कलाकारांच्या मानसिक आरोग्यासाठी अधिक मनोवैज्ञानिक सहाय्य मागू लागले आहेत.
भारत पिछाडीवर
भारतात मूळात मानसोपचार करवून घेत असल्यास ते दडविण्याकडे लोकांचा प्रामुख्याने कल असतो. अशा स्थितीत सायकॉलॉजिस्टची विविध क्षेत्रांमध्ये मदत किंवा सेवा घेणे ही दूरची बाब ठरते. तसेही भारतात मानसशास्त्रविषयक शिक्षण आणि त्यादिशेने असलेला लोकांचा ओढा कमी प्रमाणात आढळून येतो. तरीही महानगरांमध्ये आता सायकॉलॉजिस्टची मदत घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यात काही शाळा, उद्योग, क्रीडाजगताकडून सक्रीय पावले उचलली जात असल्याचे अलिकडच्या काळात दिसून आले आहे.